Tuesday, December 30, 2025

चोला माटी - कहाणी प्रधान गोंड आदिवासींची...

 


"चोला माटी" हे इंग्रजी आणि फ्रेंच मधून अलिकडेच प्रकाशित झालेले, मध्य भारतातील “परधान गोंड” आदिवासींच्या जीवनावरील पुस्तक आहे. हे पुस्तक आदिवासींच्या मृत्यूपासून ते जन्मापर्यंतच्या प्राचीन विधींचे सुंदर वर्णन करते. "दुपट्टा" या संस्थेचे संस्थापक ख्रीस्तीआन जुर्ने, पद्मजा श्रीवास्तव (लेखिका), मयंक सिंग शाम (चित्रकार) आणि कोमल बेदी सोहल (छायाचित्रकार आणि पुस्तक रचनाकार) यांनी हा कलात्मक संयोग जळवून आणला आहे.

या पुस्तकाचे अनावरण पॅरिसमधील प्रसिद्ध “Passage Choiseul” (Espace Cinko) (पासाज श्वाजल – एस्पास चिंको) येथे मयंक सिंह शाम यांच्या चित्रांच्या प्रदर्शनासह करण्यात आले. या संपूर्ण चमूसोबतची एक अनोखी आणि खास चर्चा येथे तुमच्यासमोर सादर! 

टीप:

१) ह्या मुलाखतेतील संभाषण तीन भाषांमध्ये (इंग्रजी, फ्रेंच आणि हिंदी) आहे. 

https://www.youtube.com/watch?v=6ubK4oa13hU

२) एकाच वेळी दोन भाषांमध्ये धावती उपशीर्षके दिली आहेत.

३) ही मुलाखत खालील भाषांमध्ये लेख म्हणून वाचता येईल: इंग्रजी, फ्रेंच, इटालियन, मराठी, हिंदी, बंगाली आणि कन्नड.

पत्ता:

https://thefrenchmasala.blogspot.com/2025/12/chola-maati-pardhan-gond-rituals-from.html

 

 

अनुबंध: नमस्कार! माझं नाव अनुबंध काटे. मी पॅरिस मध्ये राहणारा एक अभियंता आहे आणि "Les Forums France Inde" नावाच्या समूहाचा सह-संस्थापक देखील आहे. 

आज, माझ्यासोबत चार खास पाहुणे आहेत याचा मला खूप आनंद आहे. गेल्या आठवड्यात मी "चोला माती" नावाच्या एका सुंदर पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहिलो होतो, त्याबद्दल बोलायला ते इथे आले आहेत. हे पुस्तक मध्य प्रदेशातील पाटनगर नावाच्या एका छोट्या गावातील "गोंड प्रधान" जमातीबद्दल आहे. हा आगळावेगळा पुस्तक-प्रकल्प ज्यांनी केला, त्या चार लोकांची ओळख  मी करून देणार आहे. या पुस्तकात मध्यप्रदेशातील कलाकारांनी बनवलेल्या सर्व सुंदर चित्रांचा समावेश आहेच शिवाय त्यात काही दर्जेदार छायाचित्रे आणि तिथल्या सामुदायिक जीवनाचे वर्णनही आहे.

सर्वप्रथम, मी ख्रीस्तीआन जुर्नेची ओळख करून देतो. ते दुपट्टानावाची संस्था चालवतात. त्यानंतर माझ्यासोबत आहेत, पद्मजा श्रीवास्तव, मयंक सिंह शाम आणि कोमल बेदी सोहल. आता मी ख्रीस्तीआन यांना या प्रकल्पामागील भूमिका आणि त्यांच्या  दुपट्टाया संस्थेच्या उभारणीमागील गोष्ट आपल्यासमोर मांडण्यासाठी आमंत्रित करेन. मी फ्रेंचमध्ये बोलेन कारण ख्रीस्तीआनला फ्रेंचमध्ये बोलायला आवडेल.

नमस्कार ख्रीस्तीआन! 

ख्रीस्तीआन: नमस्कार! 

अनुबंध:  या पुस्तक-प्रकल्पात आणि "दुपट्टा" संस्थेत तुमचा जो सहभाग आहे त्याबद्दल आम्हाला अधिक ऐकायला आवडेल.  "चोला माती" या पुस्तकासोबतच  पॅरिसमध्ये प्रदर्शनांत तुम्ही जी चित्रं आणि कलाकृती सादर केल्या याबद्दलही जरूर सांगा.

ख्रीस्तीआन:  मी दोन आरंभांबद्दल बोलणार आहे. पहिलं म्हणजे आमच्या "दुपट्टा" संस्थेची सुरुवात का झाली, तिची उद्दिष्टे काय आहेत याबद्दल बोलतो. मग, मी "चोला माती" प्रकल्पात भाग घेतला का होता त्याच्या मूळ कारणांबाबत बोलतो. "दुपट्टा" बद्दल बोलायचे झाले तर, ही २००८ मध्ये स्थापन झालेली एक ना-नफा तत्वावर चालणारी संस्था आहे. तिचा मुख्य उद्देश भारतातील जमाती आणि अल्पसंख्याक समूहांमधे प्रचलित असलेल्या कथा आणि चित्रे यांचं संकलन करणे आणि फ्रेंच जनतेला त्यांची ओळख करून देणे असा आहे. हे करण्यासाठी मी भारताभर प्रवास करतो. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम आणि मध्य भारतातही जातो. हे नंतर चित्रांबद्दल बोलताना अधिक तपशीलवार पाहू. मी कथांना, गोष्टींना शोधत-शोधत प्रवास करतो. मग नंतर, फ्रान्समध्ये, मी तीस लोकांच्या टीमसह "दुपट्टा" संघटनेच्या नावाखाली प्रदर्शने आयोजित करतो. आम्ही वर्षातून चार ते पाच वेळा वेगवेगळ्या फ्रेंच शहरांमध्ये, गॅलरीमध्ये भारतीय जमाती आणि अल्पसंख्याक समूहांकडून संकलित केलेला हा ऐवज प्रदर्शित करतो. हेच "दुपट्टासंस्थचे ध्येय आहे. आणि हे साध्य करण्यासाठी मी अनेक भारतीय, जे भारताला चांगले ओळखतात त्या लोकांवर विसंबून असतो. ज्यांना विविध भारतीय जमाती, भारतीय कला आणि लोककला इत्यादी गोष्टींची माहिती आहे...  याबाबत माझ्यासाठी भारतातील महत्वाची व्यक्ती म्हणजे पद्मजा श्रीवास्तव. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र काम करत आहोत. मी भारतात असताना, म्हणजे वर्षातून किमान दोनदा, आम्ही भेटण्याचा प्रयत्न करतो, बंगाल, महाराष्ट्र किंवा इतर प्रदेश 'एक्सप्लोर' करण्यासाठी एकत्र प्रवास करण्याचा प्रयत्न करतो. त्या मला चित्रकारांशी ओळख करून देतात. आज, ती स्पष्टपणे भारतातील लोककलांचे सर्वात सखोल ज्ञान असलेली व्यक्ती आहे. म्हणूनच, आम्हाला एकत्र काम करणं शक्य होतं.

एक दिवस  तिने मला तिच्या मयंकसोबत अंदाजे तीन वर्षांपूर्वी केलेल्या प्रकल्पाबाबत सांगितलं. त्यात एक पुस्तक लिहिणं आणि त्यानंतर त्यासंदर्भात प्रदर्शन करणं वगैरे अंतर्भूत होतं. सुरुवातीला मी ते काहीसं अलिप्तपणे ऐकलं, पण नंतर मात्र मी त्यात गुंतत गेलो. विशेषतः, मी जेव्हा तिच्यासोबत मयंकच्या, त्याच्या वडिलांच्या मूळ गावी गेलो तेव्हापासून जास्त गुंतलो. तिथे मी कोमललाही भेटलो. ती या प्रकल्पात छायाचित्रकार म्हणून सहभागी आहे. तेव्हाच मला या उपक्रमाच्या योग्यता आणि गुणवत्तेबद्दल खरोखर खात्री पटली.

मी सध्या इथेच थांबतो. जर तुमचा काही विशिष्ट प्रश्न असेल तर मी उत्तर देऊ शकतो, ठीक आहे?

अनुबंध: तुमची या कामाविषयीची कळकळ आणि सहभाग यासाठी मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो.अशा प्रकारच्या प्रकल्पाचं नेतृत्व, ज्यात बरेच लोक सहभागी आहेत, त्याचं इतक्या दुरून व्यवस्थापन कारणं, शिवाय वारंवार प्रवास करणं या सगळ्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात. दोन भिन्न संस्कृती आणि तिथल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी हिकमतीने काम करण्याचं कौशल्य आणि क्षमता तुमच्याकडे आहे. या कामाबद्दल तुमचे खूप खूप आभार.

हे पुस्तक इंग्रजी आणि फ्रेंच दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे हे लक्षणीय आहे.

आता मी पद्मजा श्रीवास्तव यांना आमंत्रित करणार आहे.  तिच्याबद्दल सांगण्यासाठी माझे शब्द अपुरे पडतील. ती पुण्याची आहे, तिनं वास्तुकलेचे शिक्षण घेतलं  आहे आणि १९९५ मध्ये ती तिच्या पतीसोबत वास्तुकलेमध्ये काम करण्यासाठी भोपाळला गेली. तिथे तिनं मध्य प्रदेशातील व्याघ्र प्रकल्पात पर्यावरण-पूरक पर्यटन देखील विकसित केलं. तिथेच तिची भेट स्थानिक लोककलाकारांशी आणि विशेषतः मध्य भारतातील परधान गोंडांशी झाली. ख्रीस्तीआनने म्हटल्याप्रमाणे, ती "दुपट्टा" ची सक्रिय सदस्य आहे. भारतातील कलाकारांचे कलाप्रकार आणि त्यांचे काम सादर करण्यासाठी ती वारंवार फ्रान्समध्ये येते.

पद्मजा, आपण जेव्हा याआधी भेटलो आणि या कामाबाबत तुमच्याकडून ऐकलं तेव्हाच मला खूप आनंद झाला होता. या पुस्तकात कथनांचं संपादन करण्याची जी भूमिका बजावली आहे ती खूप महत्वाची आहे. तुम्ही गेल्या २० वर्षांहून अधिक काळ मध्य प्रदेशातील या गावाला सतत भेट देत आहात. या सर्व पारंपारिक कला, संस्कृती, कौशल्ये हळूहळू लोप पावत आहेत याबद्दल तुमच्या मनात जी खोलवर चिंता आणि खंत आहे याबाबत आपण बोलल्याचं मला आठवतं. पण म्हणूनच, ही कला-कौशल्य फ्रान्स आणि जगभरातील लोकांपर्यंत पोचवून, त्यांनी दाद द्यावी यासाठी तुम्ही यथाशक्ती प्रयत्न करत आहात. आणि हे पुस्तक म्हणजे त्याचा पुरावाच आहे. कृपया या पुस्तकामागील आणि या संपूर्ण प्रकल्पामागील प्रेरणा काय होती ते थोडक्यात सांगाल का?

पद्मजा: हो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे, मी या लोकांसोबत, विशेषतः परधन गोंड लोकांसोबत, जवळजवळ २० वर्षांपासून काम करत आहे. बऱ्याचदा, जेव्हा मी मयंकसोबत बोलत बसायचे, म्हणजे मी मयंकला बऱ्याच वर्षांपासून ओळखते, तर तेव्हा आम्ही परधन गोंड लोकांच्या लोप पावत चाललेल्या परंपरा आणि आचारपद्धतींबद्दल चर्चा करायचो. मी निरीक्षण केलं होतं की तरुण पिढ्या आता जास्त 'ग्लोबल' जीवन जगत आहेत. ते त्यांच्या पूर्वजांप्रमाणे त्यांच्या संस्कृतीचे पालन करत नाहीत. मग मयंकशी चर्चा करत असताना आमच्यात एकमत झालं की आपल्याला याबद्दल काहीतरी करायला हवं. आणि मग आम्ही ठरवलं की आपल्या हातात असणारा एकमेव मार्ग म्हणजे या परंपरा आणि विधींचे दस्तऐवजीकरण करणं, त्यांच्या गावांना भेट देणं, तिथल्या लोकांच्या मुलाखती घेणं, छायाचित्रे काढणं आणि त्यांच्या आचारपद्धतींचे साक्षीदार होणं. या कामातूनच हे पुस्तक आकाराला आलं.

अनुबंध: धन्यवाद!

आणि आता मी मयंक सिंग श्यामकडे वळणार आहे, जो सुप्रसिद्ध कलाकार जंगरसिंग श्याम यांचा मुलगा आहे. जंगर यांचा फ्रान्सशी जवळचा संबंध आहे कारण ते बऱ्याचदा फ्रान्सला आले होते आणि त्यांनी येथे त्यांचे काम सादर केले होते. तर ही मयंकच्या वडिलांची ओळख. पण, आता आपण मयंकबद्दल बोलू. आणि त्यासाठी मी हिंदी निवडेन कारण मयंकला हिंदीत बोलणं जास्त सोयीचं वाटतं.

तर, मयंक एक चित्रकार आहे. तो एक कलाकार आहे आणि त्याची कला त्याच्या विचारांच्या, त्याच्या अंतरंगातील भावनांच्या आणि कल्पनाशक्तीच्या अभिव्यक्तीमध्ये खोलवर रुजलेली आहे. त्याने मला एकदा असंही सांगितलंय की तो नैसर्गिक रंगांवर प्रयोग करतो आणि ते रंग तो त्याच्या चित्रांसाठीही वापरतो. तो  बहुधा आपल्याला नंतर याबद्दल अधिक सांगेल. त्याच्या चित्रांमध्ये आपल्याला बरीच प्रतीकात्मकता दिसते. अर्थात, निसर्ग ही त्यांची मध्यवर्ती कल्पना आहे. उदाहरणार्थ, त्याच्या चित्रांमध्ये आपल्याला अनेक मासे दिसतात, जे पाणी, नद्या, पाऊस आणि समुद्र दर्शवतात. मग चित्रांत झाडं आहेत. झाडं ही धरणीमाता, शक्ती, सजीव प्राण्यांमधले परस्परसंबंध दर्शवतात. आणि शेवटी, पक्षी, जे आकाश, स्वातंत्र्य आणि स्वर्ग दर्शवतात.

स्वागत आहे मयंक!

मयंकधन्यवाद अनुबंध!

अनुबंध: आज तुम्ही आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी आहात याचा मला खूप आनंद आहे.

मागच्या वेळी जेव्हा आपण भेटलो, तेव्हा तू तुझ्या दोन-तीन चित्रांबद्दल बोलला होतास. त्यामागील कल्पना, तू ते कसं चित्रित केलसं याबद्दल तू जे बोललास ते आज तू सर्वांसोबत शेअर केलंस तर आवडेल. आणि त्याआधी, ही प्रक्रिया, तुझा प्रवास कसा होता याबद्दलचे अनुभव तू आम्हाला सांगू शकशील का? तू उल्लेख केला होतास की तुझ्या वडिलांचा तुझ्या कामावर खूप प्रभाव होता. शिवाय, तू गावात राहत नसलास तरी  तू गावातील जीवनाशी जवळून जोडलेला आहेस. तर या सगळ्याकडे तू कसं पाहतोस?

मयंक: माझा हा प्रवास २०२१ मध्ये सुरू झाला. एक कलाकार नेहमीच त्याच्या कल्पनेतून चित्र रंगवतो. मी पद्मजाला खूप काळापासून ओळखतो. आम्ही जणू एका कुटुंबातलेच आहोत. आम्ही बऱ्याच काळापासून एकमेकांसोबत काम करत आहोत. आम्हा दोघांनाही असं वाटलं की आपण एकत्र काहीतरी काम करायला हवं. माझ्या मनात अशी एक कल्पना होती की संपूर्ण मानवी जीवन लाकडाच्या तुकड्यावर घडते. मी त्याबद्दल एक कथा रचली  होती. मग पद्मजासुद्धा म्हणाली, मयंक, आपण ही कथा का सांगत नाही? आपल्या पारंपारिक कथा, आपलं संपूर्ण जग, आपली जीवनशैली, परंपरा, गावांमध्ये आपण जे जीवन जगतो, त्यावर काम करूया. आणि माझे वडीलही फक्त एकाच गोष्टीवर काम करत नव्हते. त्यांनी फक्त रंगांवर काम केलं नाही. त्यांनी मातीवर काम केलं, पुतळे (शिल्पं) बनवले, ग्राफिक्समध्येही काम केलं. त्यांच्या मातीच्या मूर्ती पाहिल्यानंतर मलाही आतून वाटलं की मीही माझ्या वडिलांप्रमाणेच मातीवर काम केलं पाहिजे. मग पद्मजाने एकदा मला विचारलं, तू तुमचे पारंपारिक रंग का वापरून नवीन काम का सुरू करत नाहीस? तर अशी आमच्यासाठी एक कहाणी सुरू झाली.

आमच्या गावात एक प्रसिद्ध कथा आहे, त्याची  एक वेगळी गंमत सांगतो. त्या कथेवर आमच्या सर्वांचा विश्वास आहे आणि आम्ही त्याची पूजा करतो. ती गोष्ट आहे "महान देवाबद्दल, महान देवाच्या उत्पत्तीबद्दल आणि या पृथ्वीच्या उत्पत्तीबद्दल. ही कथा मला खूप काळापासून प्रेरणा देतेय. माझ्या वडिलांच्या चित्रांकडे नुसतं बघूनही मला प्रेरणा मिळते. मग मला हे तंत्र सापडलं. माझे वडील नेहमी म्हणायचे, तुम्ही काहीही काम करा, जे आतून येते, जे हृदयातून येते, तीच खरी कला आहे. माझा त्यावर विश्वास आहे.

मग पद्मजासारख्या लोकांना भेटल्यानंतर, आम्हाला हे काम पुढे नेता आलं. २०२१ च्या सुरुवातीला मी "राम राज" या प्रकारच्या मातीने कामाला सुरुवात केली. ही इथली पारंपारिक माती आहे. आमची एक परंपरा आहे. विशेष करून आमचे जे खास सण म्हणजे "दिवाळी" आणि इतर काही सण असतात त्यावेळी आम्ही या विशिष्ट मातीने आमच्या घराच्या भिंतींना सारवतो (प्लास्टर करतो). ही आमची एक प्रथा आहे. देव-देवतांसाठी 'जागा' बनवण्याची प्रथा. याच रंगांनी मी प्रथम पृथ्वीची उत्पत्ती आणि 'महान देवा'च्या जन्माचे चित्रण करणारी माझी चित्रे बनवली. ती नैसर्गिक रंगात बनवली.

हो, हेच ते चित्र आहे.

 



या चित्रात, सुरुवातीपासूनच मला प्रभावित करणारी एक थोर गोष्ट आहे. ती म्हणजे हे चित्र विश्वाची उत्पत्ती दर्शवतं. आमच्या पूर्वजांच्या कथांनुसार, 'काळा'ची सुरुवात झाली तेव्हा संपूर्ण विश्व, संपूर्ण परिसर पाण्याने भरलेला होता. याचा अर्थ असा की पृथ्वी किंवा मातीसारखे काहीही नव्हते. असे म्हटले जाते की या खाऱ्या पाण्याच्या मध्यभागी, कमळाचे एक पान होते (पुरई पान) आणि त्यावर गोड्या पाण्याचा एक थेंब होता. त्या थेंबातूनच 'महान देवा'चा जन्म झाला. म्हणून, मी कल्पना केली की जर मला इतक्या विशाल समुद्राची कल्पना करायची असेल, तर मला ते नुसत्या रंगांमार्फत  पहायला आवडणार नाही. मला ते माशाच्या रूपात पहायला आवडेल. म्हणून, मी मासे बनवले. कमळाच्या पानावरच्या त्या लहान पाण्याच्या थेंबामुळे देवाचा जन्म झाला. मग, मी स्वतःला विचारले, वास्तवात नवीन जीवाचा जन्म कुठून होतो? आपल्या सर्वांना माहित आहे की प्रत्येक जीव कुठे जन्माला येतो. तो योनीतून येतो. अशा प्रकारे, मी पानाकडे योनी म्हणून पाहिलं आणि ते मला जन्मस्थानासारखं दिसलं. या चित्रात मी तीच कल्पना रेखाटली आहे.

अनुबंधखरंच, हे चित्र खूप सुंदर आहे. तुम्ही मला आणखीन एक चित्र दाखवले होते. मला तेही दाखवायचं आहे.

 

 

मयंक: आमच्या समाजात लोकांनी आम्हाला ज्या काही कथा, रीती-भाती, प्रथा सांगितल्या आहेत, त्यांचं काही ना काही चित्रण केलं गेलं आहे. यावेळी पद्मजा यांच्या सहकार्याने, आम्ही संपूर्ण मालिका केली आहे. म्हणजे, अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत... अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि " एंड" साठी मी बनवलेलं हे तेच चित्र आहे. आमच्या इथे अशी एक परंपरा आहे ज्यात एका बाहुलीची पूजा (गुड्डी पूजाई) अशा प्रकारे केली जाते की शेवटी दैवी शक्ती येऊन त्या बाहुलीमध्ये प्रवेश करते. मग आम्ही त्यावर, मृत माणसांवर शिंपडातात, त्याप्रमाणे पाणी शिंपडतो. नंतर मृत माणसांच्या नावाने हळदीची गाठ बांधली जाते आणि ती कुठेतरी लपलेली असते. आणि नंतर, देव, त्याच्या शक्तीने ती प्रकट करतो. त्यावर पाणी शिंपडून, तो तृप्त होतो. आत्मा या जीवनातून मुक्त होतो. शरीर आधीच नष्ट झाल्यामुळे तो एका नवीन जन्मासाठी तयार होतो. नंतर आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. मी माझ्या काकांकडून याबद्दल आणखी एक कथा ऐकली होती. त्यांनी मला सांगितले होते की जेव्हा जेव्हा माणूस या जगातून निघून जातो तेव्हा त्याच्या शरीराचे दहन करण्यासाठी मानवजातीने अनेक विधी शोधले आहेत. पण, इतर सजीवांचे काय? पक्षी आहेत, कीटक आहेत आणि कोळी, प्राणी आहेत... जेव्हा ते मरतात तेव्हा त्यांचं कोण समाधानी करतं? म्हणूनच  असं म्हटलं जातं की गिधाड पक्ष्याला एक काम देण्यात आलं होतं. देवाच्या घरातून त्याला आदेश मिळाला होता की जेव्हा जेव्हा एखादा सजीव प्राणी मरतो, म्हणजे समजा जर त्याला एखादा प्राणी दिसला तर तो त्याने लगेच खायचा आणि नंतर पाणी प्यायचंच. तर म्हणून गिधाड सहसा काय करतात तर ते मृत प्राण्याला लगेच खातात आणि नंतर दूरच्या नदीचं पाणी पितात. मग एकदा शरीरावर पाणी शिंपडलं की आत्मा मुक्त होतो आणि नंतर तो नव्या जीवन प्रवासाला निघू शकतो. बाहुली देवीबद्दलच्या आमच्या परंपरेनुसार मी या चित्रात तेच चित्रित करण्याचा प्रयत्न केलाय. तर अशी यामागची विचार प्रक्रिया आहे. मी त्याची तुलना गिधाड पक्ष्याशी केली जो आत्म्याला समाधानी करण्याचे, नवीन जन्माकडे, नवीन जीवनाकडे नेण्याचे काम करतो.

अनुबंध: तुमचं पुस्तक वाचताना मलाही हे जाणवलं. माझ्या मनात आलं की आपण सर्वजण निसर्गातून आलो आहोत आणि आपण सर्वजण पुन्हा निसर्गाकडे परत जाणार आहोत. पुस्तकाचे नाव देखील "चोला माती" आहे. तर, याचा अर्थ आपण मातीतून आलो आहोत आणि पुन्हा मातीकडे परत जाणार आहोत.

धन्यवाद. तुम्ही ते खूप सुंदरपणे समजावून सांगितलं.

आता आपण कोमल बेदी सोहल या छायाचित्रकाराकडे वळूया. तिने या पुस्तकात तिचे फोटो समाविष्ट केले आहेत. मी तिची थोडक्यात ओळख करून देईन आणि नंतर तिच्या प्रतिक्रिया सांगायला आमंत्रित करेन. कोमल एक प्रख्यात दिग्दर्शिका, डिझायनर आणि छायाचित्रकार आहे. तिला कथाकथन करायला आवडतं. आधी बोलताना जेव्हा तिने ती या प्रकल्पात का सहभागी आहे हे ज्या प्रकारे सांगितलं तेव्हा मी त्याचा अनुभव घेतला. ती दृश्य कलाकृती देखील करते. तिने जाहिरात-क्षेत्रात बरंच काम केलं आहे. कोमलने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळवले आहेत आणि ती जगभरात प्रदर्शने भरवते.

तर, कोमल, तू आता तुझ्या गावातल्या अनुभवांबद्दल सांगावंस असं मला वाटतं. तू तिथे अनेकदा गेली आहेस, राहिली आहेस आणि तिथल्या लोकांचे जीवन अनुभवले आहेस. यामुळे हा प्रकल्प आणि पुस्तकाबद्दलच्या तुझ्या दृष्टीला आकार मिळाला. कृपया तू याबद्दल तुझे विचार आम्हाला सांगू शकशील का?

कोमल: सर्वप्रथम, अनुबंध, तुमच्या व्यासपीठावर आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमच्या पुस्तकाचे कौतुक केल्याबद्दलही धन्यवाद. आमच्या प्रदर्शनासाठी तुम्ही दिलेली प्रतिक्रिया खरोखरीच चांगली आहे. धन्यवाद!

मी २०२२ मध्ये मयंकला भेटले. पद्मजाच्या मनात या प्रकल्पाची संकल्पना आधीपासूनच तयार होती. तिने त्यावर काम सुरू केलं होतं. तथापि, जेव्हा ती याबाबत व्यक्त झाली तेव्हा मी त्याकडे लगेच आकर्षित झाले कारण मी कलांची मोठी चाहती आहे. मला त्यात सहभागी व्हायचंच होतं. अंदाजे २५ वर्षे परदेशात राहिल्यानंतर मी भारतात परतले. त्यामुळे मला खरोखरच अशा एका चांगल्या महत्वच्या प्रकल्पात सामील व्हायचे होते. जेव्हा पद्मजाने मला याबद्दल सांगितले तेव्हा मी खूप प्रभावित झाले. आम्ही दोघे पाटनगर (मध्य प्रदेश) एकत्र गेलो तेव्हा लक्षात आलं की आमची केमिस्ट्री जुळतेय. ते गाव, तिथले लोक, संस्कृती, रीतिरिवाज यांनी मी पूर्णपणे प्रभावित झाले. त्यानंतर, पद्मजा आणि मी दोघेही एकमेकांसोबत काम करू लागलो. आम्ही एकत्र काम करण्याचं ठरवलं कारण आमची केमिस्ट्री खूप चांगली जुळली. गेल्या चार वर्षांत आम्ही जमवलेली सर्व माहिती एकत्र करून एक उत्तम काम केलंय. विशेषतः माझ्यासाठी ते खूप मह्त्वाचं आहे कारण हे गाव, त्याची धरणीमातेत रुजलेली ओळख, त्यांच्या श्रद्धा, प्राचीनता आणि शहाणीव, पृथ्वीशी असलेले खोलवरचे नाते या सर्वांचा मला एक भाग व्हायचे होते. मला अशा अनेक कथा माहित आहेत. आपण जेव्हा छायाचित्रांबद्दल बोलायला सुरु करू तेव्हा मी त्याबद्दल थोडं नीट बोलू शकते. तर, प्रकल्पाची सुरुवात ही अशी झाली.

आम्ही २०२२ मध्ये सुरुवात केली तेव्हापासून २०२५ पर्यंत काम करत आहोत. हे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी आणि पुस्तक संपादित करण्यासाठी आम्हाला चार वर्षे लागली. पद्मजा यांनी संशोधन आणि लेखन केलं आणि मी पुस्तक डिझाइन केलं, हे अजून एक माझं योगदान आहे. मयंकने सर्व चित्रं काढली. हा एक मोठाच  प्रकल्प होता. अर्थातच, ख्रीस्तीआनने आम्हाला सर्वतोपरी मदत केली आणि प्रदर्शन पॅरिसमध्ये आणणं हे सर्व त्याचेच श्रेय आहे.

अनुबंध: हो. पुस्तक आणि प्रदर्शन पाहताना त्यातलं सौंदर्यशास्त्र नीट उलगडतं. यामुळे एकच नाही तर अनेक पैलू सुंदरपणे एकत्रितरित्या खुलून आले आहेत.

कोमल: अर्थातच, पुस्तकाचे मर्मस्थान म्हणजे कथाकथन आहे कारण आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करतोय. तरीही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व घटक एकात्म  प्रकारे कसे मांडले जातात ते. सगळ्याच्या केंद्रस्थानी कथाकथन असल्यानं त्याला उजाळा देणं, चित्रांना, छायाचित्रांना, पाटणगडच्या गावातील लोकांनी गायलेल्या संगीताला, मयंकने बनवलेल्या रेखाचित्रांना, प्रत्येक गोष्टीला योग्य स्थान मिळावं आणि ते सर्व अतिशय चांगल्या सौंदर्यदृष्टीने सादर करणं आवश्यक होतं. मग नंतर अर्थातच, प्रकाशन आणि पुस्तक प्रकाशित करण्याचा अधिक कठीण टप्पा. हा एक अद्भुत अनुभव होता!

अनुबंध: खरंच. या छायाचित्रांकडे वळण्याआधी, एक महत्त्वाचा पैलू माझ्याकडून निसटला होता, जो तुम्ही आताच नमूद केला. तो म्हणजे पुस्तकात तुम्ही तिथल्या लोकांची लोकगीते देखील समाविष्ट केली आहेत, जी त्यांच्या जीवनातील विविध महत्त्वाच्या टप्प्यांचे, उत्सवांचे, घटनांचे वर्णन करतात. हा भाग अतिशय उत्कृष्टपणे पुस्तकात अंतर्भूत केला आहे. हे पुस्तक खरोखरच जीवनाच्या उत्सवाचे एक निरोगी, परिपूर्ण गाठोडं आहे.

कोमल: हा एक बहुआयामी प्रकल्प आहे.

अनुबंध: खरंच. तर, या छायाचित्राबद्दल आता तुम्ही आम्हाला समजावून सांगा.


 

 

कोमल: तुम्हाला माहिती आहेच की मयंक 'महान देवा'च्या जन्माबद्दल बोलत होता. आता, ही गूढ संकल्पना छायाचित्रात कशी साकारते हे महत्वाचं आहे. शिवाय, हे फोटो कोलाज, फोटोशॉप किंवा एआय वापरून एकत्रित केलेले नाहीत. हे एकच छायाचित्र आहे. जेव्हा मासे म्हणजे जणू गर्भातला पोषक द्रव (अम्नीओटिक फ्लुईड) असल्याचं आणि कमळाचं पान हे बारा देवांचं जन्मस्थान असल्याचं दर्शन एकाच छायाचित्रातून घडवायचं असेल तर ते कसं करायचंया छायाचित्रातून मी तसा अर्थ प्रतीत होईल असा प्रयत्न केला आहे. आम्ही तिघांनीही आधीच ठरवलं होतं की छायाचित्रात चित्र किंवा चित्रात छायाचित्राची भर घालून त्यातून पुन्हा नवीन निर्मिती करायची नाही. तर या चित्रं, छायाचित्रांतून जो अर्थ प्रतीत होतोय ते माझं किंवा मयंकचं आकलन आहे. खोल गाळाच्या तलावावर तरंगणारं हे कमळाचं खोड मग माझ्यादृष्टीने नाभी बनतं, कमळाचं पान गर्भ बनतं आणि ते फूल म्हणजे जन्म! म्हणूनचं मला हे बारा देवांच्या जन्माच्या  प्रतिकासारखं दिसतं. हे छायाचित्र कलात्मकदृष्ट्या आकर्षक आहेच पण त्यापलीकडे ते महान देवाच्या जन्माचे प्रतीकही आहे.

अनुबंध: हे अजून एक चित्र, हे सुद्धा खूप सुंदर आहे!

 

 

कोमल: हे छायाचित्र, खरंतर, गावाच्या मध्यभागी असलेल्या या प्राचीन झाडाचे आहे. हे झाड थोड्या उंचावर असलेल्या पठारावर आहे. मला नेहमीच याचं छायाचित्र काढावंस वाटे कारण हे गावातलं सर्वात पवित्र झाड समजलं जातं. याबाबत लोकांची अशी श्रद्धा आहे की अकोर देव या झाडात राहतात. म्हणून या झाडाचा ते आदर करतात.  एक दिवस सकाळी खूप थंडी आणि धुकं असताना मी गावातून फिरत फिरत झाडाजवळच्या त्या सपाट जागेवर बसले होते. आणि अचानक  माझं या फोटोत दिसणाऱ्या मुलाकडे लक्ष गेलं. तो मजेत खेळत होता आणि खेळता खेळता तो झाडावर चढयला लागला. मी त्या मुलाला झाडावर चढताना पहात होते. ज्या क्षणी मी त्याला (दोन खोडांच्या मध्ये) मोकळ्या जागेत दोन्ही पाय खोडांवर रोवून आणि दोन्ही हात झाडाला धरून उभा राहिलेलं पाहिलं तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मला लक्षात आलं हाच तो शॉट आहे! त्या लहान मुलाचं झाडावर चढणं, त्याचा झाडाला होणारा स्पर्श हे सर्व या शॉटला सुंदर बनवतं.

पण या फोटोची खासियत काय हे मी सांगायलाच हवं. तुम्हाला पार्श्वभूमीवर एक स्त्रीची आकृती दिसतेय, तिचं नाव फागनी बाई आहे. मी गावातून फिरत असताना, ती माझ्यासोबत चालत होती. जेव्हा मी या मुलाला झाडाकडे धावत जाताना पाहिलं तेव्हा मीही त्याच्या मागे धावले. मी बूट आणि मोजे घातले होते. मला माहित होतं की ही उंच सपाट जागा म्हणजे एक पवित्र जागा आहे कारण ते त्यांचे मंदिर आहे. पण, मी तो फोटो टिपण्याच्या नादात इतकी गुंतले होते की त्या घाईत मी माझे बूट काढायला विसरले! सुमारे अर्धा तास मी त्या मुलाभोवतीच फिरत होते. मी एक उत्कृष्ट छायाचित्र टिपण्याच्या प्रयत्न करत होते. तो बरोब्बर तितक्याच उंचावर असावा आणि त्याने दोन्ही हातपाय झाडाला स्पर्श करत उभं राहावं अशीच माझी इच्छा होती. मी तसं छायाचित्र टिपलं तेव्हा मी स्वतःवर खूप खूष झाले. मी या उंच जागेवरून खाली उतरले तेव्हा ही बाई खूप धीर धरून माझं फोटो काढण्याचं काम पूर्ण होण्याची वाट पाहत उभी होती. आम्ही खाली उतरल्यावर ती मला एका घरात घेऊन गेली, आम्ही कपभर चहा घेतला. चहा घेताना ती मला म्हणाली, "बूट घालून तुम्ही त्या उंच जागेवर चढू नका कारण ते एक पवित्र स्थान आहे." आणि मला खूप ओशाळल्यासारखे झाले. खरंतर तिनं मला आधीच सांगायला हवे होते! तिनं काहीतरी तरी सांगायला हवं होतं. पण हे लोक मनाने खूप उदार आणि आदरातिथ्य करणारे. ती म्हणाली, "मला माहित होतं की तुम्ही कामात व्यस्त आहात, फोटो काढत आहात आणि तुमचा दुखावण्याचा हेतू नव्हता. मला तुमच्या कामात अडथळा आणायचा नव्हता कारण तुम्हाला फोटो काढताना पाहण्याचा आनंद मला हवा होता.पहा, अशा प्रकारचं आदरातिथ्य आणि संस्कृतीतलं रुजलेपण तुम्हाला कुठेही सापडणार नाही. हेच आम्ही या पुस्तकात टिपण्याचा प्रयत्न करत आहोत. मला आशा आहे की पुस्तकाची आणि छायाचित्रणाची रचना तितकीच साधी, निर्मळ असेल आणि ती या लोकांचे काही अंशी प्रतिनिधित्व करेल.

अनुबंध: धन्यवाद! मला आठवतंय, जेव्हा तुम्ही हे त्यादिवशी पुस्तक प्रदर्शनात पहिल्यांदा सांगितलं होतं आणि ते ऐकून मी खूप भावूक झालो होतो. पण आता मला आणखी एक गोष्ट लक्षात आली. तुम्ही म्हणालात की ती धुक्याची सकाळ होती आणि पार्श्वभूमी आपल्याला तशीच धूसर  दिसतेय. पण फोटोत समोरचं अगदी स्पष्ट दिसतंय. त्यामुळे एक प्रकारचा कॉन्ट्रास्ट तयार होतोय. हा लहान मुलगा जणूकाही अधांतरी लटकतोय की वर जातोय असं वाटतं. हे एक सुंदर संयोग आहे. म्हणजे स्पष्टताही आहे आणि धूसरताही आहे आणि दोघांच्या मध्ये तो मुलगा वर चढतोय.

आता आपण या चर्चेच्या शेवटाला पोचलो आहोत, पण काही गोष्टी मला जोरकसपणे नमूद करायच्या आहेत. जर  तुमच्यापैकी कोणाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर जरूर त्या सांगाव्यात. या प्रकल्पाबाबत मला आवडलेली गोष्ट म्हणजे हे खरोखर एक टीमवर्क आहे. तुमच्या प्रत्येकाकडे वेगवेगळी कौशल्ये, वेगवेगळ्या प्रेरणा आहेत, पण त्या अगदी नदीसारख्या एकत्र आल्यात. आपल्या सर्वांना एकत्र काम करताना काय अडचणी येतात हे माहित आहे, विशेषतः जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे,वेगवेगळी भाषा बोलणारे असाल तर. ख्रीस्तीआन देखील या प्रकल्पाचा एक भाग आहे. हे पुस्तक इतक्या सुंदर रीतीने लिहिलं जाणं आणि सादर होणं, त्याचं प्रदर्शन भरवणं या सर्वांतून तुमच्या टीमवर्कचे यथार्थ दर्शन घडतेय. त्यासाठी खूप खूप अभिनंदन!

त्यादिवशी प्रदर्शनात मी मयंकशी बोलत असताना मला त्याच्या आवाजातील आनंद जाणवत होता. फ्रान्समध्ये येऊन इथल्या  फ्रेंच लोकांसोबत संवाद साधण्याची, वेगळ्या संस्कृतीतील लोकांसमोर आपलं काम सादर करण्याची संधी मिळाल्याबद्दलचा त्याचा तो आनंद आहे. लोकांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न ख्रीस्तीआन खऱ्या अर्थाने साध्य करत आहे. तो आपल्याला ही संधी देतोय हे खूप महत्वाचं आहे. "लेस फोरम्स फ्रान्स इंडे" मध्ये आम्ही हेच करण्याचा प्रयत्न करतो. तुमचा हा मार्ग खरोखरच सांस्कृतिक आणि सर्जनशील आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन!

तुम्हाला कोणाला शेवटी अजून काही सांगायचं असल्यास जरूर सांगा.

ख्रीस्तीआन: मी काही बोलू शकतो का?

अनुबंध: हो जरूर.

ख्रीस्तीआन: आम्ही दरवर्षी 'दुप्पटा' मध्ये पद्मजासोबत इतर काही भारतीय चित्रकारांनाही आमंत्रित करतो. त्यांची आम्ही निवड करतो. कधीकधी, ते थोडं कठीण असतं. त्यांना इतर लोकांशी जुळवून घेण्याची क्षमता असणं आणि त्यात आनंद वाटणं आवश्यक असतं. त्यांना फ्रान्समध्ये येण्याची आवश्यकता कळली पाहिजे. आणि म्हणूनच मला मयंकबद्दल थोडं बोलावसं वाटतं. मला त्याच्याबद्दल सगळ्यात आवडलं ते म्हणजे त्याचा दृष्टिकोन. हे काम म्हणजे त्याची  त्याच्या वडिलांना आदरांजली आहे असं त्याला वाटतं. आज अनेक 'प्रधान गोंड' कलाकार बनले आहेत. मयंकसारखी प्रतिभा असलेले खूप कमी आहेत. बहुतेक चित्रकारांमध्ये खूप तीव्र अहंकार आहे, पण मयंकमध्ये मला तसं दिसलं नाही. तो खऱ्या अर्थाने त्याच्या वडिलांना आदरांजली वाहणारा माणूस आहे. ही गोष्ट मला त्याच्याकडे आकर्षित करते.

दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं गावावरचं प्रेम. त्यानं अनेक वर्षांपासून त्याच्या गावातील माती, गेरु, खनिजं निवडत  रंग तयार करण्यासाठी मेहेनत केलीय. आणि शेवटची तिसरी गोष्टही मयंकबद्दल आहे पण ती या प्रकल्पातील इतर सदस्यांनाही लागू आहे. मी त्यांच्यासोबत काही दिवस मयंकच्या मूळ गावी आणि जनागढ येथे गेलो होतो. तिथे मला गावातल्या सर्व लोकांमध्ये मयंकबद्दल किती आदर आहे हे अनुभवण्याची  संधी मिळाली. हा आदर त्याच्या संपूर्ण कुटुंबाबद्दल, त्याच्या कलेबद्दल आहे आणि या गावाबाबत समग्रतेनं व्यक्त झाल्याबद्दलची कृतज्ञता आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानतो कारण माझ्यासाठी, सुरुवातीला, हा एक छोटा प्रकल्प होता, पण नंतर तो खरोखरच अद्भुत बनला.

मी अजून एक शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो. काही दिवसांपूर्वी जेव्हा आम्ही कोमलसोबत ल्योनमध्ये भेटलो तेव्हा तिने मला विचारलं, "तुम्हाला यातील कोणता फोटो आवडतो?" मी थोडासा बावचळलो किंवा बावचळण्याचं नाटक केलं म्हणा, मी तिला सांगितलं की तो त्या लहान मुलाचा फोटो आहे, जो दोन झाडांच्या खोडांमधून चढतो तोच !मात्र मी तिला का आवडतो ते सांगितले नाही. त्याचं कारण असं आहे की तो फोटो पाहिल्यावर लगेच मला वाटलं की दोन झाडांच्या खोडांमधून चढणारा तो एक खेकडा आहे! ज्यांना परधान गोंडमधील दंतकथा आणि मिथकं माहित असतात त्यांना हे माहित असतं की खेकड्याला गोंडांच्या कथेत आणि कल्पनेत एक अनिवार्य स्थान असतं. तर, धन्यवाद कोमल. मला माहित नाही की तुम्ही फोटोत तसं जाणूनबुजून केलं आहे का. तरीही, तसं केल्याबद्दल धन्यवाद! तुम्ही एकत्रितपणे केलेल्या सर्व कामाचा हा खरोखरच एक उत्कृष्ट परमोच्च बिंदू आहे असं मला वाटलं.

पद्मजाबद्दल मला वेगळं काही सांगायची गरज नाही. तिला चांगलंच माहिती आहे की तिच्यामुळेच आपण फ्रान्समध्ये हे सर्व करू शकलो. पुन्हा एकदा धन्यवाद पद्मजा!

अनुबंध: खूप खूप धन्यवाद, ख्रीस्तीआन. तुम्हाला सर्वांना फ्रेंच अवगत असती तर किती छान झालं असतं असं मला तीव्रपणे वाटलं. कारण ख्रीस्तीआनने मयंक, कोमल आणि पद्मजा यांच्याबद्दल (फ्रेंचमध्ये) जे विचार आणि प्रशंसा व्यक्त केली ते सर्व अतिशय समर्पक आहे. पण ठीकच आहे, या मुलाखतीला  वेगवेगळ्या भाषांमध्ये सबटायटल्स देण्याचा आणि त्याचं ट्रान्सक्रिप्ट देखील उपलब्ध करण्याचा मी प्रयत्न करेन. म्हणजे हे संभाषण अनेकांना सहज कळेल.

तुम्हा सर्वांचे विशेष आभार. जर कोणाला अजून काही बोलायचं नसेल तर आता आपण थांबूया का?

पद्मजा: मी फक्त एवढंच सांगायचंय की, आम्ही पाटणगढमध्ये सध्या जे काही घडतंय त्याचं दस्तऐवजीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही पूर्ण संशोधन फक्त पाटणगढमध्येच केलं आहे. खरं सांगायचे तर, जागतिकीकरण कधीही थांबणार नाही. ते होतच राहणार आहे, परंतु आमचा प्रयत्न वर्तमानात काय घडतंय ते पाहणं आणि त्याची भूतकाळातील परिस्थितीशी तुलना करणं असा आहे. म्हणजे, जे होत चाललंय ते आपण बदलू शकत नाही. तरीही, आपण ते पुनरुज्जीवित करायचा फक्त प्रयत्न करू शकतो. नाही.... पुनरुज्जीवितसुद्धा नाही करू शकत पण किमान त्याचं कायमस्वरूपी दस्तऐवजीकरण करू शकतो.

अनुबंध: खरंच!

हे पुस्तक इंग्रजी आणि फ्रेंचमध्ये प्रकाशित करण्याच्या तुमच्या प्रयत्नांचं मी कौतुक करतो. या सत्रासाठी आणि या संभाषणासाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. तुम्ही मला फ्रेंच, इंग्रजी आणि हिंदीमध्ये बोलण्याची संधी दिली. भाषा मला खरोखर महत्त्वाच्या वाटतात. माझा असा विश्वास आहे की त्या आपल्या सर्वांना जोडण्यासाठी आहेत. मानवी मूल्यं आणि माणसांचं जोडलेपण हे अधिक महत्त्वाचं आहे. या शब्दांसह, मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. पॅरिसमध्ये तुमचा मुक्काम चांगला व्हावा, तुमच्या प्रदर्शनाची सांगता व्हावी अशी मी शुभेच्छा मी व्यक्त करतो. पॅरिस आणि फ्रान्समध्ये इतरत्र तुमच्या अधिक भेटी घडाव्यात यासाठी मी शुभेच्छा देतो. आशा करूया की हे पुस्तक अधिकाधिक लोक वाचतील आणि त्याचं कौतुक करतील. धन्यवाद.

सर्व: आम्हाला इथं आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद!


 


पद्मजा श्रीवास्तव

 

पद्मजाचा कला आणि संस्कृतीतील प्रवास पुणे, भारतातील येथे सुरू झाला, जिथे तिने पुणे विद्यापीठातून वास्तुकलेमध्ये पदवी प्राप्त केली. १९९५ मध्ये भोपाळमध्ये स्थायिक झाल्यानंतर, तिने तिच्या पतीसोबत एक वास्तुकला व्यवसाय सुरू केला. त्यांनी एकत्रितपणे मध्य प्रदेशातील प्रमुख व्याघ्र प्रकल्पांजवळ वन्यजीव अधिवास डिझाइन करण्यास सुरुवात केली. या सर्जनशील प्रक्रियेदरम्यान, पद्मजाला असंख्य लोक कलाकार आणि कारागीर भेटले, ज्यामुळे या कलाकारांच्या हक्कांचे रक्षण करण्याची आवड निर्माण झाली आणि ते भारतातील आदिवासी समुदायांसाठी, विशेषतः मध्य भारतातील एक प्रमुख जमात असलेल्या गोंड लोकांसाठी समर्पित समर्थक बनले. 

ती फ्रान्समध्ये भारतीय आदिवासी कलेला प्रोत्साहन देणाऱ्या "दुपट्टा" या फ्रेंच स्वयंसेवी संस्थेची सक्रिय सदस्य आहे.

 

 

मयंक सिंग श्याम

 

मयंक हा प्रसिद्ध कलाकार जंघर सिंग श्याम यांचा मुलगा आहे. जंघर हे त्यांचे मार्गदर्शक आणि मार्गदर्शक राहिले आहेत, ज्यामुळे त्यांना कलेच्या साराची सखोल समज मिळाली. 

मयंकची कला प्रतीकात्मकतेने समृद्ध आहे, ज्यामध्ये निसर्गाच्या घटकांना खूप महत्त्व आहे. त्याच्या कलाकृतींमध्ये मासे बहुतेकदा पाणी, महासागर आणि नद्यांचे प्रतीक आहेत. झाडे पृथ्वी मातेचे प्रतीक आहेत, जी शक्ती, स्थिरता आणि सर्व सजीवांच्या परस्परसंबंधाचे प्रतिनिधित्व करतात. त्याचप्रमाणे, पक्षी आकाशाचे प्रतिनिधित्व करतात, जे स्वातंत्र्य आणि आकाशाच्या अमर्याद विस्ताराचे प्रकटीकरण करतात.

या समृद्ध सादरीकरणाद्वारे, मयंकची कला केवळ निसर्गाशी असलेले त्याचे खोल नातेच प्रतिबिंबित करत नाही तर त्याच्या आदिवासी वारशाबद्दलचा आदर आणि कौतुक देखील प्रतिबिंबित करते, प्रत्येक चित्रात अर्थ आणि महत्त्वाचे अनेक स्तर ओततात.

 

कोमल बेदी सोहल

 

कोमल बेदी सोहल ही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित सर्जनशील दिग्दर्शक, डिझायनर आणि छायाचित्रकार आहे ज्यांचे काम कथाकथन आणि दृश्य कला यांचे मिश्रण करते. जाहिरात जगात तीन दशकांहून अधिक काळाचा अनुभव, ज्यामध्ये अनेक कान्स लायन पुरस्कार जिंकणे आणि कान्स लायन ज्युरीमध्ये काम करणे यांचा समावेश आहे, ती तिच्या छायाचित्रणात कथाकथन, तपशील आणि रचना यावर बारकाईने लक्ष केंद्रित करते. 

कोमलच्या छायाचित्रणाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर मान्यता मिळाली आहे.

 

 

 

ख्रीस्तीआन जुर्ने

 

ख्रीस्तीआन हे "दुपट्टा" संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. गेल्या १४ वर्षांपासून, ही संस्था भारतीय वांशिक गटांच्या कलात्मक अभिव्यक्ती आणि हस्तकला उत्पादनांना पाठिंबा देण्यासाठी, विकसित करण्यासाठी आणि जतन करण्यासाठी काम करत आहे. फ्रान्स आणि भारतात स्थित, ही संस्था पारंपारिक चित्रकारांचे प्रदर्शन/विक्री, कार्यक्रम, चित्रकला कार्यशाळा आणि युरोपियन दौरे आयोजित करते. चित्रकारांनी प्रतिनिधित्व केलेल्या वांशिक गटांमध्ये आणि भारताच्या सूक्ष्म संस्कृतींमध्ये रस असलेल्या लोकांमध्ये संबंध प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

 

चोला माटी - कहाणी प्रधान गोंड आदिवासींची...

  " चोला माटी" हे इंग्रजी आणि फ्रेंच मधून अलिकडेच प्रकाशित झालेले , मध्य भारतातील “परधान गोंड” आदिवासींच्या जीवनावरील पुस्तक आहे...