Wednesday, June 10, 2026

Family Reunion - मराठी

 

 

  



 

नुबंध: नमस्कार! माझे नाव अनुबंध काटे. मी पॅरिसस्थित अभियंता असून, विविध लेखकांच्या मुलाखती घेत असतो. आज माझ्यासोबत लेखिका मारी-कारोलिन सालिओ-यात्झमिर्स्की आहेत. त्यांनी यापूर्वीही अनेक पुस्तके लिहिली आहेत; मात्र त्यांचं सर्वात अलीकडचं पुस्तक 'फॅमिली रियुनिफीकेशन' आहे. आज आपण याच पुस्तकाविषयी संवाद साधणार आहोत.

सर्वप्रथम, आपल्या प्रेक्षकांसाठी तुमचा थोडक्यात परिचय करून द्यायला मला आवडेल. आपण मानववंशशास्त्रज्ञ आणि चिकित्सकीय मानसशास्त्रज्ञ आहात. आपण इनाल्को (INALCO- National Institute of Oriental Languages and Civilizations) येथे मानववंशशास्त्राच्या प्राध्यापिका आहात. तसेच सेस्मा (CESSMA- Center for Social Science Studies of the Africans, Americans, and Asians worlds) येथे संशोधक म्हणून कार्यरत आहात.

याशिवाय, पॅरिस नॉर्थच्या प्रादेशिक मानसआघात केंद्रात (अविसेन रूग्णालय, बॉबिनी, पॅरिस) आपण चिकित्सकीय मानसशास्त्रज्ञ म्हणूनही कार्यरत आहात. भारत, ब्राझील आणि फ्रान्समधील स्थलांतर आणि सामाजिक बहिष्काराशी संबंधित प्रश्नांवरही आपण काम करत आहात.

तुम्ही अनेक पुस्तके लिहिली आहेत. मी ती एकामागोमाग एक सांगणार आहे. कारण आपला हा पहिलाच संवाद आहे आणि मला वाटते की तुम्ही केलेल्या कार्याचा आवाका आपल्या प्रेक्षकांना समजणे महत्त्वाचे आहे.

आज आपण 'फॅमिली रीयुनिफिकेशन' या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. त्याआधी, २०२३ मध्ये तुम्ही लिहिलेली 'बॉम्बे' ही कादंबरी आहे. त्यानंतर, २०२२ मधील 'लिंग्वा (नॉन) ग्राटा : लँग्वेजेस, व्हायोलन्स अँड रेझिस्टन्स इन मायग्रेशन स्पेसेस'. २०२० मध्ये 'व्हायोलन्स अँड नॅरेटिव्ह : टू स्पीक, टू ट्रान्सलेट, टू कन्वे द जेनोसाइड अँड द एक्साइल'. २०१८ मध्ये 'द व्हॉइस ऑफ दोज हू क्राय आऊट, अ डायलॉग विथ असायलम सीकर्स'. २०१४ मध्ये 'मेगा सिटी स्लम्स : सोशल एक्स्क्लूजन, स्पेस अँड अर्बन पॉलिसीज इन ब्राझील अँड इंडिया'. त्यानंतर, २०१३ मधील 'धारावी : फ्रॉम मेगा स्लम टू अर्बन पॅराडाइम'. आणि मग २००३ मधील 'महाराष्ट्र : बिटवीन ट्रेडिशन अँड मॉडर्निटी'. हो, आणि एक दिवस मला या पुस्तकाबद्दलही तुमच्याशी बोलायला आवडेल. कारण मी महाराष्ट्र राज्यातून आलो आहे. पुढे, २००२ मधील 'अनटचेबल बॉम्बे : द शॅन्टीटाउन ऑफ द लेदर वर्कर्स'. आणि 'इंडिया, पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट'.

मारी-कारोलिन, यावर तुम्हाला काही बोलायचं आहे का? या सगळ्या पुस्तकांबद्दल? काही राहून गेलं का?

मारी-कारोलिन: या अत्यंत उत्तम आणि सर्वसमावेशक सादरीकरणाबद्दल धन्यवाद.

फक्त एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. मी या अनेक ग्रंथांचे संपादन केले आहे आणि प्रत्यक्षात मी एकमेव लेखिका नाही. तुम्ही या लेखनकार्याचा सविस्तर उल्लेख केला; त्यामध्ये जवळजवळ सर्वच ग्रंथांचा समावेश होता, त्यात मी स्वतंत्र लेखिका म्हणून लिहिलेली पुस्तकेही होती.

खरं तर, अशी काही पुस्तके आहेत जी मी एकमेव लेखिका म्हणून लिहिली आहेत. विशेषतः भारतावर आधारित अशी कामे, जी गेली ३० वर्षे माझ्या मानवशास्त्रातील अभ्यासाचा मुख्य विषय होती. यात 'महाराष्ट्र', 'बॉम्बे' आणि 'धारावी' ही पुस्तके समाविष्ट आहेत. म्हणजेच, ही कामे एका समर्पित शास्त्रीय अभ्यास आणि कादंबरी यांच्यामधली आहेत, आणि माझ्यासाठी ती अतिशय वैयक्तिक स्वरूपाचीही आहेत.

यानंतर माझ्या दवाखान्यात आश्रयार्थींच्यासोबत केलेले काम आहे. तसेच 'द व्हॉइस ऑफ दोज हू क्राय आऊट' हे लेखन आणि त्यानंतर अलीकडे प्रकाशित झालेले 'फॅमिली रियुनिफिकेशन' ही मात्र अशी पुस्तके आहेत, ज्यांची मी एकमेव लेखिका आहे. इतकंच.

अनुबंध: ठीक आहे. धन्यवाद.

मी हे पुस्तक वाचलं आणि मला ते खूप आवडलं. मी सुरुवातीला थोडक्यात सांगतो की हे पुस्तक नेमकं कशाबद्दल आहे.

या पुस्तकात तुम्ही आणि 'तुम्ही' म्हणताना मी तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला उद्देशून बोलतो आहे. तुम्ही फ्रान्समध्ये एका स्थलांतरित कुटुंबाचे, म्हणजेच गिनी कोनाक्री या आफ्रिकन देशातून आलेल्या सात जणांच्या डियालो कुटुंबाचे, स्वागत केलं. आणि निश्चितच, एका प्रशासकीय चुकीमुळे या कुटुंबाचे जीवन विस्कळीत झाले. या प्रशासकीय चुकीमुळे हे कुटुंब अस्थिर परिस्थितीत ढकललं गेलं.

हे पुस्तक स्थलांतरित कुटुंबाच्या फ्रान्समधील स्वागताची कहाणी जितकी आहे, तितकंच ते फ्रान्समधील स्थलांतरितांच्या प्रशासकीय आणि कायदेशीर स्थितीभोवती असलेल्या अनिश्चिततेबद्दलही आहे. पण आता मी या पुस्तकाच्या शेवटाकडे येतो, जिथे तुम्ही म्हणता की हे पुस्तक मुळात कथा सांगण्यासाठी किंवा वैयक्तिक अनुभव मांडण्यासाठी नव्हतं. उलट, ते स्थलांतरितांना समाजात सामावून घेताना स्थलांतरित व यजमान समाज या दोन्ही बाजूंना सहन कराव्या लागणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिणामांचा (cost of integration) अभ्यास म्हणून लिहिलं जाणार होतं.

तर मग हे सगळं प्रत्यक्षात कसं घडलं? कारण ही अशी एक अनुभवात्मक घटना होती जी तुम्ही सर्वांनी एकत्र जगली. आणि नंतर तुम्ही ती लिहून मांडण्याचा निर्णय घेतला. कृपया या अनुभवाबद्दल थोडं सांगाल का?

मारी-कारोलिन: या सादरीकरणाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, जे प्रत्यक्षात खूपच खरे आहे आणि जे या अनुभवाच्या सुरुवातीची आठवण करून देते, आणि पुढे जाऊन ती एक कहाणी बनते.  खरं तर, मी जवळजवळ २० वर्षांपासून स्थलांतराच्या प्रश्नांवर काम करत आहे. मी अशा व्यक्तींना सल्लामसलत देते जे निर्वासनाच्या परिस्थितीत आहेत, ते आश्रय मागणारे असोत, निर्वासित असोत, नाकारले गेलेले असोत, काहीही असो. त्यांच्या कागदपत्रांचे स्वरूप आणि त्यांचा कायदेशीर दर्जा हा प्रश्न फ्रान्समध्ये त्यांच्या वास्तव्याच्या संदर्भात अनेकदा अडथळा ठरतो. आणि मग, अशा भीषण हिंसाचारातून गेलेल्या व्यक्तींनी स्वतःला पुन्हा उभे करण्याची प्रक्रिया हा माझ्या कामाचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. या विषयांवर मी आतापर्यंत मुख्यतः वास्तवाधारित लेखन केले आहे. तर, 'द व्हॉइस ऑफ दोज हू क्राय आऊट'  या पुस्तकाद्वारे आणि त्यानंतर आम्हाला, माझ्या पतीला आणि मला, अनेक संधी मिळाल्या, कारण जेव्हा आपण पाहुणचार करतो, तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे आपल्यात तशी इच्छा असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्याकडे तसे करण्याची साधने असली पाहिजेत. काही वर्षांपूर्वी आमच्याकडे पॅरिसमध्ये एक सदनिका होती. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे आमच्याकडे स्वागत करणे आणि त्याला राहण्याची सोय करून देणे आम्हाला शक्य होत असे. अनेकदा आमच्याकडे अशा व्यक्ती राहत असत ज्या स्थलांतराच्या प्रक्रियेत होत्या, कागदपत्रांची प्रतीक्षा करत होत्या किंवा आश्रयासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेत होत्या. त्या विविध देशांतील आणि विविध राष्ट्रीयत्वांच्या असत.

त्यांच्याशी संवाद साधणे, विचारांची देवाणघेवाण करणे हा आमच्यासाठी आनंददायी अनुभव असे. मी आणि माझे पती दोघेही कामात व्यस्त असल्यामुळे त्यांच्याशी भरपूर वेळ घालवण्याची संधी नेहमीच मिळत नसे; तरीही त्यांचे स्वागत करणे आणि त्यांना आपलेपणाने सामावून घेणे हे आमच्यासाठी समाधान देणारे होते.

आणि मग ही गोष्ट अशी घडली.

एके दिवशी मला माझ्या एका फार जुन्या रुग्णाचा फोन आला. तो आता माझा रुग्ण राहिला नव्हता, पण अधूनमधून त्याच्या बातम्या मला कळवत असे. त्याला रस्त्यावर येण्याची वेळ आली होती, जरी दुसरीकडे त्याने प्रशासनाकडून आपल्या कुटुंबाच्या पुनर्मिलनाची परवानगी यशस्वीपणे मिळवली होती. म्हणजेच, गिनी कोनाक्रीमध्ये राहिलेल्या आपल्या कुटुंबाला कायदेशीर मार्गाने फ्रान्समध्ये आणण्याची प्रक्रिया त्याने पूर्ण केली होती. या परिस्थितीत मी आणि माझ्या पतीने त्यांना एका वर्षासाठी आमच्या घरी आसरा देण्याचा निर्णय घेतला, तोपर्यंत त्यांच्या सर्व गोष्टी काही प्रमाणात स्थिरावतील. म्हणजे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होईल आणि त्या कुटुंबाला स्वतःच्या पायावर उभे राहता येईल. हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत नवा आणि भावनिकदृष्ट्या खूप स्पर्शून जाणारा होता. कदाचित याचे कारण असेही होते की यावेळी आम्ही एखाद्या एकट्या प्रौढ व्यक्तीला नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाला आश्रय देत होतो. त्यामुळे त्यात अधिक संवाद, अधिक जवळीक आणि अधिक तीव्र भावनिक अनुभव आले. त्यांच्यासोबत मुलेही होती. आणि मुलांची प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी ही बालपणाची दृष्टी असते, आश्चर्याची, शोध घेण्याची, कधी कधी भीतीचीही.

त्याच काळात मी 'सामावून घेण्याची किंमत'(द प्राइस ऑफ इंटिग्रेशन) नावाचे पुस्तक लिहिण्याच्या प्रक्रियेत होते. त्याचा विषय होता - स्थलांतरितांचे स्वागत करणे म्हणजे नेमके काय? पण हे स्वागत दोन्ही बाजूंनी: ज्यांचे स्वागत केले जाते त्यांच्यासाठी, आणि जे स्वागत करतात त्यांच्यासाठीही.

हा अनुभव प्रत्यक्ष जगल्यानंतर मला वाटू लागले की हा विषय लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचू शकेल, जर तो अधिक संवेदनशील आणि मानवी स्वरूपात मांडला गेला. शैक्षणिक अभ्यास, संकल्पनात्मक मांडणी किंवा घडलेल्या घटनांचे तात्त्विक विश्लेषण यांमधून जाण्याऐवजी, वाचकाला या अनुभवाच्या प्रवासात सोबत घेऊन जाणे अधिक अर्थपूर्ण ठरेल असे मला वाटले. कारण हा अनुभव मुळातच अत्यंत भावनिक होता. त्याचबरोबर तो असंख्य आश्चर्यांनी, प्रश्नांनी आणि नव्या जाणिवांनी भरलेला होता. दोन कुटुंबांच्या सहजीवनातून उलगडणारा हा प्रवास केवळ एकत्र राहण्याचा नव्हता; तो एका वेगळ्या धर्माला, वेगळ्या संस्कृतीला आणि जीवन जगण्याच्या इतर पद्धतींना जवळून जाणून घेण्याचाही प्रवास होता.

अनुबंध: खूप छान. धन्यवाद.

आपल्यापैकी बरेच जण दुसऱ्यांना मदतीचा हात देऊ इच्छितात. मात्र बहुतांश वेळा ती मदत एखाद्या ठराविक कृतीपुरती मर्यादित असते. एक सद्भावनेचा क्षण येतो आणि निघून जातो. पण तुम्ही जे केले, ते केवळ मदत नव्हती; ती एक वचनबद्धता होती. पुढे काय घडेल, याची खात्री कुणालाच नव्हती, ना डियालो कुटुंबाला, ना तुम्हाला. म्हणूनच हा अनुभव मला अत्यंत आगळावेगळा आणि असामान्य वाटतो.

मला हेही सांगावेसे वाटते की तुम्ही मुलांविषयी बोलत होता, तेव्हा ती सर्व मुले एकाच वयोगटातील नव्हती. त्यांच्यात लहान मुले होतीच, पण किशोरवयीन मुलीही होत्या. या पैलूकडे आपण थोड्याच वेळात पुन्हा वळू. पण माझ्या दृष्टीने हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे.

मला वाटते की आपण पुढे बोलायला सुरुवात करण्यापूर्वी, श्री. डियालो यांनी सहन केलेल्या सर्व यातनांबद्दल आणि गिनीमध्ये राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबानेही ज्या हालअपेष्टा सहन केल्या त्याबद्दल थोडे बोलणे आवश्यक आहे.

तुमच्या पुस्तकात तुम्ही लिहिल्याप्रमाणे, माझ्या दृष्टीने श्री. डियालो हे एक राजकीय निर्वासित होते. त्यांच्यावर छळ करण्यात आला होता. अखेरीस तेथून निसटण्यात ते यशस्वी झाले आणि स्पेनमार्गे युरोपमध्ये पोहोचले; त्यानंतर ते फ्रान्समध्ये आले.

पण फ्रान्समध्ये आल्यानंतरही त्यांचा संघर्ष संपला नाही. उलट, पुढील सुमारे पाच वर्षे त्यांना अनेक प्रशासकीय अडथळ्यांना आणि कागदोपत्री प्रक्रियांना सामोरे जावे लागले.

घरासाठी मिळणारी मदत, CAF म्हणजे कुटुंब भत्ता निधी, CMU म्हणजे सार्वत्रिक आरोग्य संरक्षण योजना, तसेच इतर अनेक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना सतत प्रयत्न करावे लागले. आणि हे सर्व एका उद्देशासाठी होते, आपल्या कुटुंबाला फ्रान्समध्ये आणण्यासाठी. सर्वप्रथम हे सिद्ध करणे आवश्यक होते की ते खरोखरच त्यांचे कुटुंब आहे. आणि त्यानंतर त्या कुटुंबाला फ्रान्समध्ये आणण्याची प्रक्रिया पूर्ण करायची होती.

दुसरीकडे, श्रीमती डियालो म्हणजे फातिमा डियालो यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सर्वप्रथम, श्री. डियालो यांच्याकडे शासनविरोधी किंवा राष्ट्रविरोधी व्यक्ती म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे त्याचे परिणाम त्यांच्या कुटुंबालाही सहन करावे लागले.

फातिमा डियालो यांना गिनी कोनाक्री आणि आयव्हरी कोस्ट यांदरम्यान अनेकदा ये-जा करावी लागली. त्यात प्रचंड कागदोपत्री प्रक्रिया होती. बोटांचे ठसे देण्याच्या औपचारिकता, विविध प्रशासकीय कामे आणि शहरांमधील मोठमोठे प्रवास. या सगळ्यांमुळे त्यांना खूप हाल सोसावे लागले.

थोडक्यात, मला समजलेली परिस्थिती साधारण अशी आहे. आता तुम्ही आम्हाला या कुटुंबाविषयी अधिक सांगू शकाल का? फ्रान्समध्ये येण्यापूर्वी त्यांना कोणत्या संकटांना आणि खडतर प्रसंगांना सामोरे जावे लागले?

मारी-कारोलिन: हो, तुम्ही हे अत्यंत समर्पकपणे मांडले आहे.

प्रत्यक्षात, स्थलांतरितांच्या प्रश्नाला कलंकित करणाऱ्या राजकीय चर्चांमध्ये निर्वासितांच्या वास्तव परिस्थितीकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, आणि ही बाब खरोखरच चिंताजनक आहे. कारण या चर्चांमध्ये अनेक भिन्न प्रश्न एकाच पातळीवर मांडले जातात. परिणामी, निर्वासितांचा प्रश्न नेमका कशाविषयी आहे, हे दुर्लक्षित राहते.

आणि मग एक मूलभूत गोष्ट विसरली जाते, निर्वासितांचा प्रश्न हा आश्रयाच्या शोधात असलेल्या व्यक्तींचा प्रश्न आहे. याशिवाय, दीर्घकालीन वास्तव्यासाठी परवानगी प्रदान करणाऱ्या चार अधिकृत श्रेणींपैकी निर्वासित किंवा आश्रयार्थी व्यक्तींची संख्या अत्यंत अल्प आहे. संख्यात्मक दृष्ट्या तिचे प्रमाण नगण्य म्हणावे इतके कमी आहे. विशेषतः इतर श्रेणींतील व्यक्तींच्या संख्येशी तुलना केली असता ही वस्तुस्थिती अधिक स्पष्टपणे लक्षात येते.

थोडक्यात, या अशा व्यक्ती आहेत ज्यांना स्वतःचा देश सोडण्याची वेळ आलेली असते. श्री. आणि श्रीमती डियालो यांच्या परिस्थितीचा उल्लेख करून तुम्ही आपल्याला नेमकी याच वास्तवाची जाणीव करून दिली आहे. अखेरीस, स्वतःचा देश सोडण्याचा निर्णय घेणे आणि त्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी करणे, यासाठी मोठ्या धैर्याची आवश्यकता असते.कारण त्या वेळी संबंधित व्यक्ती गंभीर धोक्याच्या परिस्थितीत जीवन जगत असते.

येथे संदर्भ गिनी कोनाक्रीचा आहे. या देशात लोकसंख्येतील एका घटकाला दीर्घकाळ भेदभावपूर्ण वागणुकीला सामोरे जावे लागले. विशेषतः अनेक सरकारांच्या काळात, आणि खास करून अल्फा कॉंदे यांच्या शासनकाळात, या समुदायाची परिस्थिती अत्यंत धोकादायक होती. राजकीय विरोधकांशी संबंधित व्यक्तींना अतिशय त्वरेने अटक केली जाई, त्यांना कारागृहात डांबले जाई आणि त्यांच्यावर छळ केला जाई.

म्हणूनच, हा एक असा लोकसमूह आहे ज्यांच्याशी आम्ही बऱ्याच काळापासून सल्लामसलत करत आहोत,  विशेषतः 'स्टेडियम हत्याकांड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटनेनंतर. २००९ मध्ये या समुदायातील अनेक लोकांना गिनी कोनाक्रीमधील एका मोठ्या स्टेडियममध्ये डांबून ठेवण्यात आले आणि त्यानंतर त्यांचा छळ करण्यात आला, त्यांच्यावर बलात्कार झाला आणि त्यांना इतर भयंकर अत्याचारांना सामोरे जावे लागले. परिणामी, या समुदायातील काही लोकांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी फ्रान्सकडेही आश्रयासाठी प्रयाण केले. फ्रान्स हा पूर्वीचा वसाहतवादी देश असला, तरी तेथील भाषा त्यांना परिचित होती, कारण तीच भाषा त्यांनी शाळांमध्ये, प्रशासनात आणि सार्वजनिक जीवनात वापरलेली होती.

तसेच, तेथे त्यांना काही प्रमाणात आश्रय आणि सुरक्षितता लाभेल, अशी त्यांची अपेक्षाही होती. परंतु सध्याच्या आश्रयविषयक धोरणांच्या पार्श्वभूमीवर या लोकांचे स्वागत फारसे अनुकूल रीतीने होत नाही. कारण यजमान देशातही काही प्रकारची हिंसा अनुभवास येते. लोकांकडून विशिष्ट चौकटीत बसण्याची, ठरावीक प्रक्रिया आणि नियमांनुसार स्वतःला जुळवून घेण्याची अपेक्षा केली जाते.

घडले असे की, श्री. डियालो यांना आवश्यक कागदपत्रे जवळजवळ त्वरित मिळाली. याचे श्रेय फ्रेंच निर्वासित आणि राष्ट्रविहीन व्यक्ती संरक्षण कार्यालय (OFPRA) यांना जाते. प्रत्यक्षात, असे घडणे तुलनेने दुर्मिळ असते. त्यामुळे राष्ट्रीय आश्रय-अधिकार आयोग (CNDA) यांच्यापुढे अपील करण्याची वेळही आली नाही. साधारणपणे, निर्वासित आणि राष्ट्रविहीन व्यक्ती संरक्षण कार्यालयाकडून अर्ज नाकारला गेला असता, तर ही पुढील पायरी असती.

श्री. डियालो यांनी अत्यंत अल्पावधीत फ्रेंच आश्रय अधिकाऱ्यांना हे पटवून देण्यात यश मिळवले की त्यांना संरक्षणाची नितांत आवश्यकता आहे. परंतु त्याची किंमत त्यांना आपल्या कुटुंबापासून दूर राहून चुकवावी लागली. त्या वेळी त्यांचे कुटुंब सहा जणांचे होते. त्यांच्या मुलांमध्ये एक अतिशय लहान मुलगाही होता - बाला. विशेष म्हणजे, बाला हा असे मूल होते ज्याला श्री. डियालो यांनी कधीच पाहिले नव्हते. कारण बाला याचा जन्म त्यांचे वडील कारागृहात असतानाच झाला होता. अशा परिस्थितीत ते फ्रान्समध्ये आले; त्यांच्या मनात कुटुंबापासून झालेल्या विभक्ततेची आणि त्यांना मागे सोडून आल्याची तीव्र जाणीव होती.

सध्याच्या स्थलांतरविषयक राजकीय परिस्थितीत, काहीतरी गमावल्याची भावना, विभक्तता किंवा आपल्या माणसांना मागे सोडून आल्याचा अनुभव यांशिवाय स्थलांतर घडते, असे फारच क्वचित पाहायला मिळते. हा प्रवास अत्यंत कठीण असतो. असे असूनही, श्री. डियालो यांनी फ्रान्समध्ये स्वतःचे जीवन नव्याने घडविण्यास सुरुवात केली. फ्रान्समध्ये आल्यानंतर त्यांनी कौटुंबिक पुनर्मिलन प्रक्रिया सुरू केली, ज्यायोगे निर्वासित किंवा राजकीय आश्रयाचा दर्जा प्राप्त झालेल्या व्यक्तींना आपल्या कुटुंबीयांना फ्रान्समध्ये आणता येते. परंतु ही प्रक्रिया अत्यंत प्रदीर्घ असून त्यात मोठ्या प्रमाणावर कागदोपत्री कार्यवाही करावी लागते. फ्रान्समधील निर्वासन आणि आश्रयप्रक्रिया या मोठ्या प्रमाणावर कागदोपत्री कार्यवाहीवर अवलंबून असतात. तत्त्वतः ही प्रक्रिया पार पाडणे शक्य असले, तरी त्यासाठी असंख्य प्रशासकीय औपचारिकतांतून जावे लागते. मात्र सध्या अडचण अशी आहे की या प्रक्रिया आणि प्रशासकीय कामकाज अत्यंत संथ गतीने पुढे सरकतात. विशेषतः, ही अशी प्रशासकीय यंत्रणा आहे जी संशयाच्या भूमिकेतून कार्य करते. काही अर्थाने, कागदपत्रांविना राहणाऱ्या स्थलांतरितांची निर्मितीही हीच व्यवस्था करते, असे म्हणावे लागेल. या मुद्द्यावर मी पुढे पुन्हा बोलेन. थोडक्यात, कोणतीही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी प्रचंड वेळ लागत होता.

कोविडमुळेही अनेक अडथळे निर्माण झाले. शासकीय कार्यालयांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. बहुतांश प्रक्रिया इंटरनेटच्या माध्यमातून पार पाडाव्या लागत होत्या. त्यात सर्व प्रक्रिया संगणकीकृत पद्धतीने पूर्ण करणे अनिवार्य झाले होते. परंतु ज्यांना फ्रेंच भाषा पुरेशी अवगत नव्हती किंवा ज्यांना इंटरनेट सहज उपलब्ध नव्हते, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची ठरत होती. एकंदरीत, ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत नोकरशाहीप्रधान होती.

या किचकट कागदोपत्री प्रक्रियांमुळे अनेक जण नकळत अशा परिस्थितीत सापडतात, ज्या त्यांच्यासाठी अत्यंत कठीण आणि अनेकदा अनाकलनीय ठरतात. तथापि, श्री. डियालो यांनी अखेरीस आपल्या कुटुंबाच्या पुनर्मिलनाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यांनी प्रशिक्षण घेतले, नोकरी मिळवली आणि आवश्यक कायदेशीर कागदपत्रेही प्राप्त केली.

दुसरीकडे, गिनीमध्ये फातिमा डियालो एकाकी अवस्थेत होत्या. प्रवेशपरवानगी मिळवण्यासाठी त्या देखील प्रयत्नशील होत्या. फ्रेंच वाणिज्य दूतावासांमार्फत आवश्यक परवानग्या मिळवणे आणि ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर मार्गाने पूर्ण करणे, यासाठी त्या प्रयत्न करीत होत्या. परंतु त्यानंतर त्यांना किचकट प्रशासकीय प्रक्रियांचा कठोर अनुभव आला. जेव्हा हे कुटुंब म्हणजे फातिमा डियालो आणि त्यांची मुले फ्रान्समध्ये पोहोचले, तेव्हा त्या मुलांनी आपल्या वडिलांना तब्बल पाच वर्षे पाहिलेले नव्हते. तेव्हा फ्रेंच प्रशासनाने त्यांना सांगितले : "तुम्ही धार्मिक विवाह झाल्याची नोंद केली आहे. परंतु आमच्या पाहणीनुसार हा धार्मिक विवाह नसून पारंपरिक विवाह आहे. अशा परिस्थितीत, या तुमच्या पत्नी आहेत आणि ही तुमची मुले आहेत, याची खात्री आम्ही कशी करून घ्यावी?"

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, हे संपूर्ण कुटुंब पुन्हा एकदा कागदोपत्री प्रक्रियांच्या गर्तेत ढकलले गेले. आता त्यांना सर्व काही नव्याने सुरू करावे लागणार होते. यावेळी ते फ्रान्समध्ये होते; परंतु तेथे स्थिरस्थावर होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सामाजिक सहाय्याविना. त्यामुळे एका अर्थाने येथे दुहेरी हिंसा दिसून येते. एक म्हणजे, त्यांच्या मूळ देशात त्यांनी अनुभवलेली राजकीय हिंसा, ज्यामुळे त्यांना आपला देश सोडण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. आणि दुसरी म्हणजे, फ्रेंच प्रशासकीय यंत्रणेकडून अनुभवावी लागणारी हिंसा. कारण ही यंत्रणा अनेकदा व्यक्तींकडे व्यक्ती म्हणून नव्हे, तर केवळ कागदपत्रे किंवा प्रशासकीय प्रकरणे म्हणून पाहते.

आणि जेव्हा या व्यक्ती कोणत्याही सामाजिक आधाराशिवाय येथे येतात, विशेषतः त्यांच्यासोबत मुले असतात, तेव्हा परिस्थिती अतिशय झपाट्याने गंभीर किंबहुना शोकांत रूप धारण करू शकते. खरं तर, हाच या पुस्तकाचा मध्यवर्ती विषय आहे.या संपूर्ण परिस्थितीतील एक विसंगती अधोरेखित करणे, हा त्यामागचा हेतू आहे, अशी विसंगती जी पूर्णपणे असह्य आणि विवेकाला न पटणारी वाटते. कारण हा प्रश्न मुळात प्रशासकीय बाबींशी संबंधित आहे. अशा बाबी, ज्या आपण सहजपणे सोडवू शकू असे वाटते. माझ्या एका सहकाऱ्याने एकदा म्हटले होते, "एका चुकीच्या खूणेमुळे झालेली चूक आपण दुरुस्त करू शकत नाही का? त्या छोट्याशा खूणेची दुरुस्ती करता येणार नाही का?"

श्री.डियालो यांना नीट वाचता-लिहिता येत नाही. शिवाय, कौटुंबिक पुनर्मिलनासाठीचा अर्जही त्यांनी स्वतः भरलेला नव्हता. म्हणजे, एखाद्या प्रशासकीय कर्मचाऱ्याकडून जो निःसंशय सद्हेतूने काम करीत असावा, त्याच्याकडून केवळ चुकीच्या चौकटीत खूण झाली असावी. त्यामुळे विवाहाची नोंद पारंपरिक विवाहाऐवजी धार्मिक विवाह अशी झाली. आणि या एका चुकीमुळे जवळजवळ वर्षभर त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले. वकिलाची मदत घ्यावी लागली, संपूर्ण प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागली, आणि इतर अनेक औपचारिकता पूर्ण कराव्या लागल्या. इतकेच नव्हे, तर सुरुवातीचा निर्णयही बदलून घ्यावा लागला. त्या निर्णयानुसार फ्रान्समध्ये आलेले लोक हे श्री. डियालो यांचे कुटुंबच नाही, असे मानण्यात आले होते; जरी या सर्व कागदपत्रांवर दूतावासांनी शिक्कामोर्तब करून त्यांना मान्यता दिली होती.

त्यामुळे आश्रयाच्या अधिकारासंदर्भात आणि परदेशी नागरिकांशी संबंधित कायद्यांच्या अंमलबजावणीमध्ये काहीतरी अनाकलनीय असल्याची भावना निर्माण होते. मात्र, दुसरीकडे, श्री. डियालो हे तुलनेने नशीबवान ठरले, असेही मला म्हणावेसे वाटते. कारण अनेकांच्या बाबतीत ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालू राहते. आणि तोपर्यंत त्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारच्या शासकीय सहाय्याचा लाभ मिळू शकत नाही. अशीच ही वस्तुस्थिती आहे.

अनुबंध: धन्यवाद.

मला वाटते की हे नमूद करणे देखील महत्त्वाचे आहे की, दुसरीकडे, फ्रेंच प्रशासन देखील संसाधनांच्या बाबतीत अपुरे आहे. आणि अशा प्रकारच्या प्रकरणांमधील गुंतागुंत पूर्णपणे मर्यादित नाही. ती जवळजवळ सर्वव्यापी आहे आणि फ्रेंच प्रशासनात सर्वत्र आढळते. शिवाय, अशा प्रकरणांमध्ये राजकीय दबावही मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे, यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो.

तरीसुद्धा, तुमचे आभार. कारण दुर्दैवाने, भारतात आफ्रिकेविषयी पुरेशी चर्चा होत नाही. खरे तर, युरोपमध्ये, विशेषतः फ्रान्समध्ये आल्यावरच मला या विषयांविषयी अधिक जाणून घेण्याची संधी आणि शक्यता मिळाली. म्हणून, तुमचे मनःपूर्वक आभार.

पुढे जाण्यापूर्वी, श्री. डियालो हे तुमचे रुग्ण असताना सल्लामसलतीदरम्यान घडलेल्या एका पैलूकडे मला पुन्हा वळावेसे वाटते. त्यांच्या कथनातील सत्य आणि त्यांनी सांगितलेल्या घटनांच्या वस्तुनिष्ठ सत्यतेविषयी तुम्ही एक अत्यंत महत्त्वाची आणि विचार करायला लावणारी बाब मांडली आहे.

मी एक छोटासा उतारा वाचून दाखवतो. त्यानंतर त्याविषयी तुमचे मत जाणून घ्यायला मला आवडेल.

तुम्ही म्हणता :

"त्यांच्या कथनातील संदिग्धता ही एकाच वेळी त्यांच्या कल्पनाशक्तीची आणि माहितीच्या अभावाची निर्मिती आहे."

त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी तुम्ही असेही म्हणता :

"हे ते कथन नाही जे त्यांनी मला सल्लामसलतीदरम्यान केले होते. आणि मला हे माहीत आहे, कारण एखाद्या कथनातील सत्य हे रुग्णाच्या सत्यापलीकडे काही नसते. त्याचा घटनांच्या वस्तुनिष्ठ सत्यतेशी काहीही संबंध नसतो. हे ते कथनही नाही जे श्री. डियालो यांनी फ्रेंच निर्वासित आणि राष्ट्रविहीन व्यक्ती संरक्षण कार्यालय (OFPRA) यांच्यासमोर केले होते. कदाचित हे ते कथनही नसेल जे ते स्वतःला सांगत असतील. कारण मानसिक दुःस्वप्नातून जिवंत बाहेर पडण्यासाठी माणसाला स्वतःची एक वैयक्तिक मिथककथा आवश्यक असते."

तर, एक वाचक म्हणून या गोष्टींकडे मी कशा प्रकारे पाहावे आणि त्यांचे आकलन कसे करावे? या संदर्भातील या बाबी तुम्ही आम्हाला कशा समजावून सांगाल?

मारी-कारोलिन: हा अत्यंत चांगला प्रश्न आहे. दिग्दर्शक बोरिस लोज्कीन यांच्या 'द स्टोरी ऑफ सुलेमान' (The Story of Souleymane) या चित्रपटातही हाच प्रश्न उपस्थित केला आहे. चित्रपटाच्या शेवटी एक अतिशय प्रभावी मुलाखत आहे. त्या क्षणी आपल्याला उमगते की, प्रत्यक्षात सुलेमान फ्रान्समध्ये ज्या कारणांसाठी आल्याचे सांगतो, त्यापेक्षा त्याच्या येण्यामागे काही वेगळी आणि अधिक वैयक्तिक कारणे होती. विशेषतः त्याच्या आईच्या परिस्थितीशी संबंधित.

मला असे म्हणायचे आहे की, अशा प्रकारच्या देशत्यागांमध्ये आणि स्थलांतरांमध्ये वास्तव अनेकदा अत्यंत गुंतागुंतीचे असते. मी अशा एका मानस-आघात सल्लामसलत केंद्रात काम करते, जे सर्वांसाठी खुले आहे. आमच्याकडे फ्रेंच रुग्णही येतात. उदाहरणार्थ, दहशतवादी हल्ल्यांचे बळी ठरलेले लोक. त्यांच्या अनुभवांचा निर्वासनाशी काहीही संबंध नसतो.

माझा मुद्दा असा आहे की, प्रशासकीय यंत्रणा एका विशिष्ट प्रकारच्या कथनाची अपेक्षा करते. आश्रय मागणाऱ्या व्यक्तीने आपली कहाणी अशा स्वरूपात मांडावी की त्यात पडताळून पाहता येण्याजोगे तपशील, ठोस माहिती आणि आवश्यक कागदोपत्री आधार असावा. परंतु वास्तवाची गुंतागुंत अनेकदा इतकी मोठी असते की असे सुसंगत आणि सलग कथन नेहमीच शक्य होत नाही. प्रशासकीय यंत्रणेलाही या प्रश्नांची पूर्ण जाणीव असते; ती या विषयांबाबत अनभिज्ञ नसते. तरीदेखील हे प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचेच राहतात. अत्यंत हिंसक परिस्थितीत जगणाऱ्या कुटुंबांना जे निर्णय घ्यावे लागतात, ते अनेकदा विलक्षण गुंतागुंतीचे असतात.

आणखी एक गोष्ट म्हणजे, जेव्हा एखाद्या व्यक्तीने छळ सहन केलेला असतो, जेव्हा ती हिंसेची बळी ठरलेली असते, तेव्हा ही गुंतागुंत अधिकच वाढते. आणि हे लक्षात ठेवले पाहिजे की येथे आपण मानवी हिंसेबद्दल बोलत आहोत, एका माणसाने दुसऱ्या माणसावर केलेल्या हिंसेबद्दल. ही गोष्ट विसरता कामा नये. ही हिंसा जाणीवपूर्वक केलेली असते. ती क्रौर्याची कृत्ये असतात. ती अत्यंत भयावह असतात.

मी येथे त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तीबद्दल बोलत नाही, ज्यामुळे एखादे गाव उद्ध्वस्त झाले असेल. मी येथे माणसांनी माणसांवर केलेल्या हिंसेबद्दल बोलत आहे. आणि अशा अनुभवांशी सामना करणे अत्यंत, अत्यंत कठीण असते.

म्हणून ही हिंसा अशा टप्प्यावर पोहोचते की आपण कल्पनेपलीकडच्या गोष्टींना सामोरे जातो. उदाहरणार्थ, जेव्हा आपलाच शेजारी हत्या करतो; जेव्हा आपण आपल्या मुलांना अत्यंत भीषण हिंसेच्या परिस्थितीत पाहतो आणि त्यांना वाचवू शकत नाही अशा घटना.

हीच मानस-आघाताची (psychotrauma) मुळ संकल्पना आहे. म्हणजे असा क्षण, जेव्हा विचारांच्या चौकटी पूर्णपणे विस्कळीत होतात.

त्या अवस्थेत आपण आता 'सामान्य जगाशी' कोणताही संबंध जोडू शकत नाही अशा जगाशी जिथे एका माणसाच्या शब्दावर दुसरा विश्वास ठेवू शकतो. अशा जगाशी जिथे, शेवटी, अवकाश आणि काळ हे नेहमीप्रमाणे स्थिर, दैनंदिन वास्तवाचा भाग असतात. येथे मात्र रुग्णांच्या मनात हे सर्व पूर्णपणे कोलमडून पडलेले असते. म्हणजे मानवनिर्मित हिंसेमुळे त्यांची संपूर्ण विचारचौकटच उद्ध्वस्त झालेली असते. आणि म्हणूनच मानस-आघाताच्या अवस्थेत एक अतिशय लक्षवेधी गोष्ट घडते. अशा अवस्थेत प्रत्यक्षात अनेक प्रकारची कथने अस्तित्वात येतात. एक म्हणजे ती कथने जी आम्ही या व्यक्तींना विचारतो जी अर्थातच सत्याशी जोडलेली असतात आणि ज्याचा आम्ही शोध घेत असतो.

परंतु कधी कधी रुग्णाचा संज्ञानात्मक त्रास इतका तीव्र असतो की त्यांना आठवणी स्पष्टपणे आठवणे कठीण जाते. गोष्टी गोंधळलेल्या होतात. काहीही स्पष्ट राहत नाही; हे सर्व का करावे लागले किंवा हे आपल्याकडून का मागितले गेले, हेही समजेनासे होते. उदाहरणार्थ, येथे एक पहिले कथन असते, जे फ्रेंच निर्वासित आणि राष्ट्रविहीन व्यक्ती संरक्षण कार्यालय (OFPRA) अपेक्षित करते. राष्ट्रीय आश्रय हक्क न्यायालय (CNDA) सोबत मिळून ह्या फ्रान्समधील आश्रय प्रक्रियेतील दोन प्रमुख संस्था आहेत. या संस्था एका विशिष्ट प्रकारच्या कथनाची अपेक्षा करतात. ही कथने अनेकदा ठरावीक चौकटीत बसवलेली असतात, आणि हीच गोष्ट काहीशी समस्याजनक ठरते.

याशिवाय, मला असेही सांगावेसे वाटते की एखादी व्यक्ती जितकी अधिक 'मनोआघातग्रस्त' असते, म्हणजेच तिने जितकी अधिक हिंसा अनुभवलेली असते आणि ज्याचा परिणाम तिच्या विचारचौकटींवर, संज्ञानात्मक प्रक्रियांवर आणि स्मृतीवर झालेला असतो ; तितकेच ते व्यक्त करणे कठीण होत जाते.

अशा व्यक्तीसाठी सुसंगत आणि स्वाभाविकपणे बोलणे अधिकच अवघड होऊन बसते. इथेच या प्रशासकीय यंत्रणांचा एक मोठा विरोधाभास दिसतो. कारण त्या एका बाजूला सुसंगत आणि स्वाभाविक कथनाची अपेक्षा करतात.हेच आपण सर्व अहवालांमध्ये पाहतो : “संबंधित व्यक्ती घडलेल्या घटनेबाबत सुसंगतपणे बोलू शकली नाही.”

पण जर एखादी व्यक्ती खरोखरच तीव्र आघातावस्थेत असेल, तर ती गोष्ट स्पष्टपणे सांगू शकत नाही. ही अशी हिंसा आहे जी शब्दांच्या पलीकडे जाते. आणि म्हणूनच मानसशास्त्रज्ञाचे काम नेमके इथेच सुरू होते.

येथे दुसरे एक कथन अस्तित्वात असते : “ती व्यक्ती स्वतःशी काय बोलू शकते?” अशा अनेक प्रसंगांमध्ये लोकांना सतत निर्णय घ्यावे लागतात. काही महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ यावर अत्यंत नेमकेपणाने चर्चा करतात.

उदाहरणार्थ, मानसविश्लेषक नताली झाल्टमान यांचे काम. त्या केवळ मृत्यू-प्रेरणेवर किंवा जीवन-प्रेरणेवर लक्ष केंद्रित करत नाहीत, जरी त्या दोन्ही मूलभूत संकल्पना मान्य करतात. त्या ज्याला 'अराजक प्रेरणा' (anarchic impulse) म्हणतात, त्या संकल्पनेवर त्या विशेष भर देतात - म्हणजे अत्यंत हिंसक परिस्थितीत निर्माण होणारी मानसिक हालचाल. आणि अशा परिस्थितीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचा त्या सखोल अभ्यास करतात.

त्यांच्या मते ही एक प्रकारची प्रवृत्ती असते, जगण्याची मूलभूत प्रेरणा. जी माणसाला अतिशय वेगाने निर्णय घ्यायला भाग पाडते. येथे निवड असते, पण ती जवळजवळ 'बळजबरीने करावी लागणारी निवड' या स्वरूपाची असते. अशा क्षणी सर्व काही अतिशय वेगाने घडत असते आणि आपण कोणत्याही सुसंगत निर्णयप्रक्रियेच्या चौकटीत राहत नाही. उदाहरणार्थ, आपल्या प्रियजनांना वाचवणे, अपघातातून बाहेर पडणे किंवा हिंसक परिस्थितीतून सुटका करणे, या गोष्टी क्षणाक्षणाला घडत असतात.

मला काही प्रसंग आठवतात. कधी कधी आम्ही अशा लोकांना भेटतो जे खरोखरच अशा परिस्थितीतून गेलेले असतात, भूमध्य समुद्र पार करताना, अस्थायी बोटीत, जिथे स्वतःचे मूल हातातून निसटत आहे आणि बुडण्याच्या स्थितीत आहे, आणि मदत करण्याची क्षमता जवळजवळ नाही. अशा प्रसंगांमुळे माणूस कल्पनेपलीकडच्या वास्तवासमोर उभा राहतो. या आघातातून उरतात त्या भयानक प्रतिमा ! जिथे व्यक्ती स्वतः त्या घटनेची साक्षीदार आणि अंशतः सहभागी असते, पण परिस्थितीवर तिचे नियंत्रण राहिलेले नसते. मग प्रश्न उरतो : अशा अनुभवांबद्दल, विशेषतः जेव्हा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा नुकसान झालेले असते, तेव्हा हे लोक स्वतःशी नेमके काय बोलत असतात?

आणि मग तिसरे एक कथन अस्तित्वात असते, ज्यापर्यंत आपण जाण्याचे धाडसही करत नाही. म्हणजे असे कथन जे प्रत्यक्ष सल्लामसलतीत (consultation) उभे राहते. कारण ते इतके हिंसक असते की ते खरोखरच शब्दांच्या पलीकडचे असते. असे अनुभव असतात जे मुळात व्यक्त करणेच शक्य नसते. आजची आश्रय देणारी प्रशासकीय यंत्रणा अशा प्रकारे रचलेली आहे आणि माझ्या मते त्यात बदल होऊ शकतो. माझ्या मते त्या व्यवस्थेत अनेक गोष्टी बदलण्याची गरज आहे.

गेल्या आठवड्यात मी CNDA (राष्ट्रीय आश्रय हक्क न्यायालय) येथे होते आणि मी पुन्हा एकदा हे मांडले की अनेक प्रकरणांमध्ये आपण अपेक्षा करतो ते 'सुसंगत आणि स्वाभाविक कथन' प्रत्यक्षात शक्य नसते. हे पुन्हा मांडणे आवश्यक आहे की सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी कदाचित दुसरी पद्धत आवश्यक आहे, पण आज ती साधने उपलब्ध नाहीत. माझ्या मते ती साधनेच नाहीत. प्रत्यक्षात, जेव्हा आपण सल्लामसलतीच्या परिस्थितीत असतो, मानसशास्त्रज्ञ म्हणून , तेव्हा 'सत्य काय आहे' हा मुद्दाच केंद्रस्थानी नसतो. ते आपले उद्दिष्टही नसते.

आपले लक्ष सर्वप्रथम रुग्णाच्या दुःखाकडे असते. ही व्यक्ती इतक्या तीव्र दुःखाच्या अवस्थेत का आहे? ती पुन्हा सामान्य जीवनाकडे का परत जाऊ शकत नाही? गंभीर नैराश्य आणि मानस-आघात असलेल्या व्यक्तींना असे मानसिक अडथळे असतात की त्यांना जगणेच कठीण होऊन बसते. कधी कधी आत्महत्येच्या प्रवृत्तीही दिसतात. त्यामुळे सल्लामसलतीचा खरा उद्देश कथनातील 'सत्य' शोधणे हा नसतो. ते वास्तवाशी जुळते का नाही, हे पाहणे हा मुद्दा नसतो. तर प्रश्न असा असतो : या व्यक्तीमध्ये पुन्हा काही शक्यता कशी निर्माण करता येईल? पुन्हा बोलणे शक्य कसे होईल? पुन्हा जीवनाशी आणि इतरांशी जोडणारा सामाजिक संबंध कसा निर्माण होईल? कारण काही क्षणी व्यक्तीचा इतरांवरचा विश्वासच पूर्णपणे नाहीसा झालेला असतो. यालाच 'वस्तुसंबंध' (object relation) असे म्हणतात- जेव्हा संपूर्ण जग शत्रुत्वपूर्ण आणि विरोधी वाटू लागते.

म्हणून मी या सर्व गोष्टी सांगताना वाचकाला थोडा विचार करायला प्रवृत्त करायचा प्रयत्न करते. कारण जेव्हा आपण असे मानतो की आश्रयाचा प्रश्न हा फक्त सत्य आणि वास्तवाचा प्रश्न आहे, तेव्हा आपण पूर्णपणे चुकीच्या दिशेने जातो.

आपण असे गृहित धरतो की आपल्याला त्या वस्तुनिष्ठ सत्यापर्यंत पोहोचता येईल. पण प्रत्यक्षात परिस्थिती इतकी गुंतागुंतीची असते की त्या व्यक्तीने बाहेर पडण्यासाठी कोणत्या मानसिक संसाधनांचा आधार घेतला, हे आपण कल्पनाही करू शकत नाही, आणि कधी कधी ती संसाधने अत्यंत अनपेक्षितही असतात.

काही प्रसंगांमध्ये मुलांना वेगवेगळ्या नावांनी नोंदवावे लागले आहे, वडिलांचे नाव बदलावे लागले आहे. आणि नंतर प्रवासात मृत झालेल्या वडिलांच्या नावासोबत काय करायचे, हा प्रश्न उभाच राहतो. अशा सगळ्या गोष्टी व्यक्तीला अत्यंत तीव्र मानसिक ताणाच्या परिस्थितीत ढकलतात. आणि हे सर्व त्या व्यक्तीसाठी अतिशय कठीण असते, ज्या व्यक्तीला या सर्व हिंसेतून वाचण्यासाठी स्वतःची एक 'कथा' तयार करावी लागते.

अनुबंध: हो, अगदी बरोबर. माझ्यासाठी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की कथनातील संभाव्य विसंगतीचा परिणाम स्वतः त्या व्यक्तीवरही अतिशय गुंतागुंतीच्या स्वरूपात होत असतो. आणि ही संभाव्य विसंगती त्या व्यक्तीवर स्वतःवरच एक प्रकारचा दबाव टाकत असते. त्यामुळे हे सर्व खरोखरच अत्यंत गुंतागुंतीचे आहे.

परंतु आता मला तुम्ही आणि तुमचे पती निकोलास यांनी मिळून घेतलेल्या त्या निर्णयाबद्दल बोलायचे आहे- त्यांना आपल्या घरी ठेवण्याच्या निर्णयाबद्दल. आणि त्या काळात तुम्ही अनुभवलेल्या भावनांविषयीही मला जाणून घ्यायला आवडेल. मी पुस्तकातून काही छोटे उतारे निवडले आहेत. मी ते वाचून दाखवतो, जेणेकरून आपण त्या क्षणांना पुन्हा एकदा उजाळा देऊ शकू.

त्यामुळे तुम्ही निकोलास यांना श्री. डियालो यांना भेटायला पाठवले. भेटीनंतर ते म्हणाले : “मी कोणत्याही स्थलांतरिताला पाहिले नाही. मी कोणत्याही निर्वासिताला पाहिले नाही. मी फक्त आपल्या मुलांसाठी अत्यंत भीतीत असलेला एक कुटुंबप्रमुख पाहिला.” आणि पुढे ते म्हणाले : “या परिस्थितीसाठी मुले जबाबदार नाहीत. त्यांनी हे सर्व घडावे अशी कोणतीही मागणी केलेली नव्हती; ते या परिस्थितीत स्वतःहून आलेले नाहीत.”

पण दुसरीकडे, त्यांना स्वीकारण्याचा प्रत्यक्ष प्रश्नही समोर आला. तुम्ही म्हणता : “पण इथे आपण सात जण आहोत, त्यात पाच मुले आहेत ज्यांच्याकडे कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नाहीत. तसेच वेळेचे वाटप करावे लागेल. आपला वेळ आधीच अपुरा आहे आणि आपल्या स्वतःच्या मोठ्या मुलांसाठीही वेळ द्यावा लागतो.”

निकोलास उत्तर देतात : “हा त्यांच्यासाठीही एक अनुभव असेल. आणि तरीही, हे सगळं आधीच सुरू झालेलं आहे. आणि मग या घराचा मूळ हेतू, ज्यामध्ये तुम्ही त्यांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला होता, तो पूर्णपणे वेगळा होता.तो आमच्या पालकांसाठी ग्रामीण भागातील शांतता आणि कुटुंबासोबत विश्रांतीचे क्षण यासाठी राखून ठेवला होता, आमच्या नव्या ग्रामीण जीवनाच्या योजनेचा एक भाग म्हणून.” नंतर असेही म्हटले आहे : “आणि असेही लोक आहेत जे आम्हाला सांगतात की आम्ही त्यांना रस्त्यावरून ‘वाचवले’, सामाजिक कार्यात वापरल्या जाणाऱ्या त्या शब्दांत जसे म्हटले जाते.”हे त्रासदायक आहे, कारण त्यातून प्रत्यक्ष भेटीचा खरा अर्थच हरवतो. तरीही, आपण काहीतरी ठरावीक रचना तयार करण्याच्या गरजेतून पुढे जात असतो.”

आणि तुम्ही त्यांच्यासोबत एक प्रकारचा करार करण्याचाही प्रयत्न केला होता, जरी ती कल्पना पूर्णपणे यशस्वी झाली नाही. पण या सगळ्यातून दिसते ती भावना, त्या सर्व गुंतागुंती - वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर, त्यांच्या बाजूने आणि तुमच्या बाजूनेही. आणि इथेच ही खास भेट आणि त्यांना स्वीकारण्याचा निर्णय उभा राहतो.

मग या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा पाहता? त्या काळाकडे तुम्ही कसे पाहता?

मारी-कारोलिन: ऐका, मला वाटतं तुम्ही ही महत्त्वाची वाक्यं उद्धृत करून खूप चांगलं काम करत आहात.

खरं तर, इथे असा एक दुरावा होता जो कदाचित एखाद्या तर्कसंगत निर्णयापर्यंत पोहोचू शकला असता. आणि माझ्यासाठी स्वतःला असं सांगणं कठीण होतं- की "बघ, हे एका कुटुंबाबद्दल आणि त्या वडिलांबद्दल आहे ज्यांना मी सल्लामसलतीदरम्यान भेटले होते." तत्त्वतः, मानसोपचारतज्ज्ञ आणि तिचं वैयक्तिक आयुष्य यांच्यात एक बंदिस्त जग असतं. आणि मग, सल्लामसलतीची ही जागा आहे, जिचं या सगळ्यापासून खूप चांगल्या प्रकारे संरक्षण केलं पाहिजे. जरी ते संपून बराच काळ लोटला होता तरी. आणि मग हे घर होतं. या घरासाठी आमच्या खूप योजना होत्या. खरं तर, कधीतरी पूर्णपणे या घरात राहायला जाण्याचा विचार आमच्या मनात होता. २०२३ मध्ये माझे वडील, सावत्र वडील हयात होते. तर, त्या वेळी, जेव्हा ऑक्टोबर २०२२ मध्ये, या प्रकरणाच्या सुरुवातीला हे सगळं सुरू झालं. आणि मग, माझे सावत्र वडील वारले. असो. या मोठ्या घरासाठी आमच्या अजूनही कौटुंबिक योजना होत्या, ज्यामुळे आम्ही पॅरिसपासून थोडे दूर गेलो, आणि आम्हाला एखाद्या ग्रामीण भागासारख्या ठिकाणी पाय रोवता आले. आणि मग, मला एक पती मिळाला आहे ज्याला हिरवळ खूप आवडते!

त्यामुळे हे सगळं माझ्या मनात सुरू होतं. खरंच, काही वेळा एक वेगळ्याच प्रकारची भेट घडते. एक अशी प्रत्यक्ष भेट, एक असा अनुभव. अशा भेटीचं स्वरूपच काही वेगळं असतं.

अशा भेटी सामान्य भेटींहून पूर्णपणे वेगळ्या असतात. कदाचित कारण त्या अतिशय दुर्मीळ असतात, अत्यंत अपवादात्मक असतात, त्यामुळेच त्या इतक्या वेगळ्या भासतात. त्यात काहीतरी घडत असतं, एकाच वेळी ठाम आणि अपरिहार्य असं काहीतरी. अशा भेटीमुळे अनेक अनपेक्षित गोष्टी सुरू होतात. आणि दुसरीकडे त्या पूर्णपणे अनिश्चितही असतात. कदाचित अशा भेटीसाठी अनेक योग जुळावे लागतात.

आपण दिवसभर लोकांना भेटत असतो. पण अचानक कधी तरी एक खरी भेट घडते, एक अर्थपूर्ण भेट. आणि माझ्या मते, नेमकं हेच या कुटुंबाबाबत घडलं. म्हणजे निकोलास त्यांना भेटायला गेले, कारण प्रामाणिकपणे सांगायचं तर मी या सगळ्यात थोडी जास्तच गुंतलेली होते. मला वाटत होतं की ही गोष्ट अनेक लोकांशी संबंधित आहे. ती फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित राहिलेली नव्हती. आणि मग येणारी जबाबदारी खूप मोठी वाटत होती. आणि शेवटी, जर खरोखर काही गंभीर समस्या असत्या, तर पण प्रत्यक्षात आम्ही खूप नशीबवान होतो.

कुटुंबाची अवस्था चांगली होती. ते आनंदी होते. कुटुंबातील सदस्य एकमेकांशी नीट जुळवून घेत होते. कोणताही गंभीर आजार नव्हता. मधेच लक्षात आलेली क्षयरोगाची समस्या देखील आता पूर्णपणे नियंत्रणात होती.

सर्वप्रथम, हे मुलांमुळेच शक्य झाले, हे मान्य करावे लागेल. पण हे आपल्याला आधीच माहीत होते. तरीही खरी भेट नेहमीच अज्ञाताशी जोडलेली असते. इथेही अनिश्चिततेकडे उडी होती, अज्ञाताकडे टाकलेले पाऊल. आणि तरी त्यामागे कुठेतरी एक विलक्षण विश्वासही होता - अशा भेटींमध्ये तो असतोच, असे मला वाटते. निकोलास त्यांना भेटायला गेले. त्यांनी एक चिंताग्रस्त वडील पाहिले, मुले होती, आणि आमचे घर मोठे होते. त्यामुळे आम्ही त्यांचे स्वागत केले आणि हळूहळू सगळे जुळत गेले.

संपूर्ण पुस्तकात एकीकडे तर्कशुद्ध विचार आणि दुसरीकडे प्रत्यक्ष अनुभव यांच्यात सतत ताण दिसतो. तर्क सांगत होता की या कुटुंबाने स्वतःचे स्वावलंबन निर्माण करणे गरजेचे आहे, म्हणजे त्यांनी स्वतःचे घर शोधावे आणि ज्या देशात ते आले आहेत, तिथे हळूहळू स्थिर व्हावे. कुठल्याही परिस्थितीत मागे परतणे शक्य नव्हते.

दुसरीकडे आमच्यासाठी ती एक भेट होती - दररोज मिळणारा, अनेक चांगल्या अनुभवांनी भरलेला एक प्रवास. हे विशेषतः मुलांमुळे शक्य झाले.

आणि मग असे दिसते की प्रत्यक्ष जगण्याच्या गरजा आणि मुलांनी आणलेली नवलाई, त्यांनी उघडलेले नवीन जग, तसेच पालकांसाठी निर्माण झालेल्या नव्या शक्यता - या सगळ्यांमध्ये सतत एक प्रकारचा ताण राहिला. हा ताण कधी कधी संघर्षातही बदलू शकत होता, आणि त्याला सांभाळत पुढे जावे लागायचे.

आणि मग काही अतिशय वेगळे सांस्कृतिक घटक दिसतात, जे या कुटुंबाचे एक वैशिष्ट्य आहे. प्रत्यक्षात, त्यांची सध्याच्या क्षणात जगण्याची क्षमता, एक असा वर्तमान जो आनंददायी होता. तो पुन्हा एकत्र आलेल्या कुटुंबाचा आनंद होता. त्यामुळे इथे काहीतरी खरोखरच वेगळं दिसतं. कोणत्याही परिस्थितीत, स्थलांतराच्या विषयावर १५ ते २० वर्षे काम करूनही, हे माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. प्रत्यक्षात मी असं काही ना पाहिलं होतं, ना अनुभवलेलं होतं.

अनुबंध: हो, आणि नेमकं सांगायचं तर ही भेट म्हणजे दोन संस्कृतींचीही भेट होती - वेगवेगळ्या सवयी, विचार करण्याच्या पद्धती आणि प्रतिक्रिया देण्याच्या रीती यांच्या पातळीवर. आणि इथे मला काही अतिशय रंजक पैलू दिसले. कारण भारत आणि फ्रान्स यांच्यातही असे फरक मी अनुभवले आहेत. मी पुस्तकातून काही घटना उद्धृत करतो.

पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा या कुटुंबाला आणण्यासाठी गेलात - ते सध्या दुसऱ्या एका आफ्रिकन कुटुंबाच्या घरी तात्पुरते वास्तव्यास होते. तेव्हा गाडीच्या आसनक्षमतेमुळे अनेक फेऱ्या माराव्या लागल्या. तुम्ही म्हणता : “शेवटी आम्ही आधी मुलं आणि पालकांना बसवलं आणि मोठ्या मुलींना मागे ठेवून आलो. हा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता.”

दुसरा प्रसंग असा की श्री. डियालो अनेक वर्षांच्या विभक्ततेनंतर संपूर्ण कुटुंबाला विमानतळावर भेटायला जाणार होते. मात्र त्यांनी लगेच विमानतळावर न जाता सुमारे पाच-सहा तास मशिदीत प्रार्थनेत घालवले. आणि याबाबत त्यांच्या कुटुंबाला काहीच माहिती देण्यात आलेली नव्हती.

तिसरी गोष्ट म्हणजे श्रीमती डियालो यांनी केलेले निरीक्षण : फ्रान्समध्ये बोलल्या जाणाऱ्या शब्दांपेक्षा लिखित शब्द अधिक प्रभावी ठरतो.

आता नेमकं या वेळेच्या विषयावर येऊया. आपण वेळ कसा अनुभवतो?

तुम्ही म्हणता की वेळ कसा जाणवतो :

तरीही आपण तो जाणवू शकतो. डियालो कुटुंब आमच्याकडून काहीतरी वेगळं अपेक्षित करतं. ते एकत्र घालवलेला वेळ अपेक्षित करतात - कोणताही दुसरा उद्देश नसलेला, कोणत्याही ठरावीक वेळापत्रकाशिवाय.” “आणि अनेकदा, जेव्हा तुम्ही उपलब्ध नसता, तेव्हा तुम्ही नकार देता, सांगता की तुम्ही येऊ शकत नाही, आणि त्यांना निघून जावं लागतं.” आणि त्या मुलींचं उत्तर असायचं : “ठीक आहे. आम्ही योग्य वेळ येण्याची वाट पाहू.”

तुम्ही म्हणता : “मला वाटतं ते वेळेची वाट पाहतात, आणि आपल्याला तो वेळ कसा ‘वाया’ जाऊ द्यायचा हेच जमत नाही. आपण आपला वेळ काटेकोरपणे आखून ठेवण्याच्या मागे असतो, तो वाया जाऊ नये म्हणून.” हा प्रतीक्षेचा वेळ, आणि सतत काहीतरी करण्याची घाई, नेहमी पुढे काय करायचं याचा विचार करत राहणं, एक पाऊल पुढे राहण्याचा प्रयत्न. हीच माझी मांडणी आहे. कधी कधी मी निकोलासला सांगते की आपण पूर्णपणे व्यापले गेलो आहोत. समस्या मांडण्याआधीच त्या अनेक स्वरूपात समोर उभ्या राहतात. तरीही सगळं काही सुरू राहतं."

आणि माझ्या दृष्टीने, मी भारतातून आलो असून, मला वेळेशी असलेलं एक पूर्णपणे नवं नातं अनुभवायला मिळालं- आधुनिक काळाशी जोडलेलं हे नातं, जे पाश्चात्त्य, विशेषतः फ्रेंच समाजात अत्यंत खोलवर रुजलेलं आहे आणि इथल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. या सगळ्या सांस्कृतिक फरकांच्या संदर्भात तुम्ही ते कसं अनुभवलंत? त्यासंबंधी तुमच्या कोणत्या आठवणी आहेत?

मारी-कारोलिन: हाहा! कदाचित इथेच आम्ही सर्वाधिक एकमेकांशी जोडले गेलो.

म्हणजे कधी कधी आमच्यासाठी हे सगळं कल्पनेपलीकडचं होतं, हे असं होऊ देणं, हा वेळ जो त्यांच्या दृष्टीने प्रार्थनांनीही भरलेला होता, आणि ज्यात ते पूर्णपणे वर्तमानात जगत होते. आमच्यासाठी मात्र हा वेळ अतिशय मंद गतीचा होता. आणि कधी कधी आम्हाला तो जवळजवळ वेळेचा अपव्यय वाटायचा. विशेषतः या कुटुंबाच्या व्यवहार्य गरजा लक्षात घेतल्या तर, कागदपत्रं, प्रक्रिया आणि पुढे जाण्याची निकड.

पण कदाचित इथेच सर्वात मोठे आव्हान होते. दुसरी संस्कृती, कुटुंबाची वेगळी रचना, जगण्याची वेगळी पद्धत, आणि वर्तमान क्षणाचा आनंद घेण्याची पूर्णपणे वेगळी समज यांना सामोरे जाणे. आणि या भेटीत आम्ही हे सर्वात तीव्रपणे अनुभवलं. म्हणजे काही अर्थाने ते आम्हाला २०-० ने हरवत होते!

कारण एकत्र असताना हे कुटुंब वेळेला पूर्णपणे भरून टाकत होतं. भेटीगाठींनी, संवादांनी, वाटून घेण्याने - अशा गोष्टींनी ज्यात कोणताही ठोस किंवा 'उत्पादक' हेतू नव्हता. तर आमचं मात्र सतत असे होते की हे करायचं आहे, ते करायचं आहे, इतक्या वाजता इथून तिथे जायचं आहे.

त्यामुळे मला वाटते, हे अनुभवताना अनेकदा ते त्रासदायकही वाटत होते. आणि त्याच वेळी आम्हाला हेही जाणवत होते की आपण 'चांगल्या प्रकारे नियोजित दिवस' म्हणजे काय, याबद्दल एक धडा घेत आहोत- एक असा दिवस जो नीट आखलेला असूनही सामायिक वर्तमानात जगता येतो.

मुलं मात्र यात फार सहज असतात. खरं सांगायचं तर, ते सहजपणे म्हणतात, 'मला हे करायचं आहे' आणि मग बाकी सगळं थांबतं. उदाहरणार्थ, एकत्र बसून पुस्तक वाचणं. पण कुटुंबाच्या रचनेत वेळेला त्यांच्यात आणि आमच्यात पूर्णपणे वेगळा अर्थ होता. प्राधान्यक्रम वेगळे होते आणि वेळेची समजही पूर्णपणे भिन्न होती. वेळ, त्याचा कालावधी आणि त्याची गती - या सगळ्यांबाबत दोन्ही बाजूंमध्ये मोठी सांस्कृतिक दरी होती.

काही वेळा आम्हाला ते जवळजवळ एखाद्या प्रकारच्या जबरदस्तीप्रमाणे जाणवत होतं. म्हणजे पुढे जाण्यासाठी त्यांना स्पष्टपणे आग्रह धरावा लागत होता, सतत प्रवृत्त करावं लागत होतं. नाहीतर संपूर्ण दिवस फक्त एकत्र जेवणातच संपून जात असे. आम्हाला ते खूप अती वाटायचं, पण शेवटी त्यातून आम्ही खूप काही शिकलो.

अनुबंध: अर्थातच, आणि या दरींबद्दल किंवा या सांस्कृतिक फरकांबद्दल थोडे अधिक बोलायचे झाल्यास, हेही अधोरेखित केले पाहिजे की श्री. डायलो यांचे कुटुंब एक धर्माचरण करणारे मुस्लिम कुटुंब आहे. आणि तुम्ही म्हणता की तुम्ही एक नास्तिक, प्रजासत्ताकवादी फ्रेंच कुटुंब आहात. त्यामुळे, हे महत्त्वाचे फरक देखील आहेत जे स्पष्टपणे दिसून येतात.

आणि मग, श्री. डायलो यांना मुलगा व्हावा अशी एक तीव्र इच्छाही होती. आणि याच संदर्भात, लहानग्या उस्मानचा जन्म झाला, तोही खरोखर विलक्षण परिस्थितीत.

तुम्ही पुस्तकात लिहिता की, "एका गावच्या रस्त्यावर माझ्या पतीने प्रसूतीस मदत करणाऱ्या दाईची भूमिका निभावली आणि एका अद्भुत चिमुकल्या जीवाचा जन्म झाला." आणि जेव्हा तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना या विलक्षण घटनेबद्दल सांगितले, तेव्हा त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, "म्हणजे, अजूनही काहीही शक्य आहे!"

तुम्ही कृपया आम्हाला या घटनेबद्दल, म्हणजेच या बालकाच्या जन्माच्या महत्त्वपूर्ण घटनेबद्दल, अधिक माहिती देऊ शकाल का?

मारी-कारोलिन: खरं तर पुस्तकाची सुरुवात याच प्रसंगाने होते. कारण या सगळ्या कथेत मला सर्वांत थक्क करणारी गोष्ट हीच वाटली. बहुधा आम्ही त्यांच्यासोबत घालवलेल्या वर्षाच्या मधल्या काळातला हा प्रसंग असावा. त्यांच्या सहाव्या अपत्याचा जन्म होणार होता- एक लहान मुलगा.

आणि गंमत म्हणजे हा जन्म रुग्णालयात झाला नाही. जरी आईची रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून नियमित तपासणी होत होती, आणि प्रसूती कृत्रिमरीत्या सुरू करण्याचंही नियोजन होतं. हे खूपच रोचक आहे. कारण यावरून असं जाणवतं की ठरावीक प्रशासकीय प्रक्रिया, रुग्णालयीन नियम आणि अशा प्रकारच्या औपचारिक चौकटींना अशा परिस्थितीशी जुळवून घेणं कठीण जात होतं.

कुटुंब रुग्णालयापासून खूप दूर राहत होतं. आईवर उपचार सुरू असलेलं फॉन्टेनब्लोचं रुग्णालय त्यांच्या घरापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर होतं. आणि मग, या कथेतल्या इतर अनेक गोष्टींसारखंच, हेही काहीसं अनपेक्षितरीत्या घडलं. सुदैवाने त्या संध्याकाळी माझे पती तिथे होते. त्यांनी श्रीमती डियालो यांना गाडीत बसवलं, आणि मग गाडीतच बाळाला जन्म झाला!

आणि मला त्यातून असंही म्हणायचं आहे की, या कुटुंबाच्या स्वागताच्या संपूर्ण कथेत सगळंच काहीसं चौकटीबाहेरचं आहे. सगळंच जरा ठरलेल्या साच्यापेक्षा वेगळं घडतं. कारण हे कुटुंबच तसं नेहमीच्या चौकटीत बसणारं नव्हतं. म्हणूनच आपण सहसा जसं सगळं काही अगदी बारकाईने आखून ठेवतो, जेणेकरून हा प्रसंग रुग्णालयातच घडेल, तसं इथे झालं नाही. उलट, हे सगळं एका वेगळ्याच पद्धतीने घडलं, आणि ते खरंतर खूप गंमतीशीर होतं. मी हा प्रसंग माझ्या आईला सांगितला. त्यावर ती म्हणाली, "अगं, शेवटी हे तर अगदी आमच्या काळासारखंच झालं ना!"

पण फरक एवढाच की आपण आता तिच्या काळात राहत नाही. ग्रामीण भागात घरी प्रसूती होणं अजूनही सामान्य मानलं जायचं, त्या काळाला आता पन्नास वर्षं उलटून गेली आहेत. माझी आई स्वतः ग्रामीण भागातून आलेली आहे. तसेच, आपण युद्धकाळातही नाही आहोत, जिथे शक्य होईल तिथे प्रसूती करावी लागायची. आजची परिस्थिती वेगळी आहे. आज प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत नियंत्रित आणि सतत देखरेखीखाली असते.

पण हे कुटुंब आणि त्यांची जीवनपद्धती, तुम्ही अगदी योग्य शब्दांत सांगितलंत- हे एक मुस्लिम कुटुंब आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनात अशा अनेक गोष्टींचा अभाव आहे, ज्या आज आपण सहज गृहीत धरतो. ही बाब महत्त्वाची आहे, कारण त्यामुळे हे कुटुंब आपण सवयीने पाहत असलेल्या रूढ चौकटीत बसत नाही.

आणि म्हणूनच शेवटी त्या बालकाचा जन्मही काहीसा विलक्षण पद्धतीने झाला. जणू एखादी अनपेक्षित घटना घडावी तसा. अर्थात, तो आम्हाला तरी अपघातासारखाच वाटला. इतर काही देशांत हे घडलं असतं, तर कदाचित ते इतकंसं असामान्य मानलं गेलं नसतं. या संपूर्ण अनुभवात मला सर्वांत आश्चर्यचकित करणारी गोष्ट हीच वाटली.

म्हणूनच पुस्तकात मी या जन्माचं स्वागत कसं करण्यात आलं, याचं सविस्तर वर्णन केलं आहे. खरं तर या बालकाच्या जन्माच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक परंपरा आणि रूढी एकत्र येतात. पालकांच्या भाषेत सांगायचं तर, या बालकाचा बाप्तिस्मा पार पाडण्यासाठी आणि त्याचं रूढीनुसार स्वागत करण्यासाठी त्या सगळ्यांची सांगड घातली जाते. आणि इथेही आपण नेहमीच्या चौकटीपासून बरंच दूर जातो. किंबहुना, अनेक बाबतींत हे दोन्ही कुटुंबांच्या बाबतीत खरं आहे.

मी पुस्तकात या सगळ्याचा उल्लेख यासाठी केला आहे की, आपली जगण्याची पद्धत आणि त्यांची जगण्याची पद्धत यांच्यातील विसंगती अधोरेखित व्हावी.

अशा घटना, अशा गोष्टी आपल्या आजूबाजूलाच, आपल्या अगदी जवळ, रोज घडत असतात. कदाचित या कथेमागचा हेतू हाही असावा की, ज्या कुटुंबांकडे आपण सहसा लक्ष देत नाही, ज्यांची सांस्कृतिक जडणघडण अद्याप पूर्णपणे पाश्चात्त्यीकृत चौकटीत सामावलेली नाही, त्यांच्याकडे एकदा नव्या नजरेने पाहावं.

कारण आज आपण ज्या तांत्रिक प्रक्रिया, प्रशासकीय नियम आणि संस्थात्मक चौकटींना सरावलो आहोत, त्या प्रामुख्याने आपल्या फ्रेंच समाजाच्या चौकटी आहेत. आणि तरीही अशा घटना फ्रान्समध्ये रोज घडत असतात.

मला असं म्हणावंसं वाटतं की, फक्त थोडं अधिक बारकाईने पाहण्याची गरज आहे. मग लक्षात येते की हे सगळं किती विलक्षण आहे.

शेवटी, या बालकाचा जन्म ज्या प्रकारे झाला, त्यात काहीतरी अत्यंत सुंदर आहे. खरं म्हणजे, आम्ही फक्त त्याची अपेक्षा केली नव्हती. आम्हाला त्याची कल्पना नव्हती आणि  त्या शक्यतेचा विचारच केला नव्हता. 

अनुबंध: अर्थात, तुम्ही पुस्तकात हा प्रसंग ज्या पद्धतीने मांडला आहे, तो अत्यंत प्रभावी आहे. आणि त्यानंतर या मुलांना साहाय्य देण्याचं, त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात त्यांच्यासोबत राहण्याचं काम सुरू झालं. हा एक महत्त्वाचा पैलू आहे. मुळात, या मुलांच्या शालेय प्रवेशासाठी तुम्हाला प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय पातळीवर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कोणती शाळा अधिक योग्य ठरेल, ती कोणत्या शहरात आहे, घराजवळ आहे की नाही, तेथे बससेवा उपलब्ध आहे की नाही, कुटुंबाकडे वाहनांची कमतरता इत्यादी अनेक प्रश्न होते. याशिवाय, या मुलांची शैक्षणिक पातळी आणि क्षमता एकमेकांपासून खूप भिन्न होती. यामागचं एक कारण म्हणजे ते गिनीहून आले होते आणि तेथील शिक्षणव्यवस्था फ्रान्समधील शिक्षणव्यवस्थेपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या.

निकोलस आणि तुम्ही, घरी या मुलांना गणित, फ्रेंच, इतिहास आणि भूगोल शिकवले आणि तुम्ही काही निरीक्षणे नोंदवली होती. तुमच्या मते, 'जगभरातील मुले ज्या डुकराच्या, मेंढीच्या किंवा घोड्याच्या पिल्लांसोबत खेळतात, तो प्रकार सर्वांना सारख्याच पद्धतीने शिकवला जात नाही का? सर्वांना असेच शिकवले जात नाही का?' आणि तुमच्या लक्षात आले की त्यांना हा शब्दसंग्रह समजायला, शिकायला अवघड जात होता. तुम्हाला वाटले की कदाचित प्राण्यांच्या पिल्लांशी संबंधित हा शब्दसंग्रह त्यांच्या स्थानिक भाषेत अस्तित्वातच नसेल. आणि मला आठवतं की मी लहान असताना भारतातही ही गोष्ट मला फारशी स्पष्ट नव्हती. मला आठवतं की आमच्याकडे काही उदाहरणे होती, पण ती सर्व प्राण्यांसाठी नव्हती. आणि तुम्ही म्हणता तसं, लांडगा, कावळा यांसारखे प्राणी त्यांच्या परिचयाच्या विश्वाचा भाग नव्हते. त्यांच्या जगात म्हशी, काळवीटं आणि इतर स्थानिक प्राणी अधिक परिचित होते. त्यामुळे शालेय शिक्षणाच्या पातळीवरही या सांस्कृतिक भिन्नता स्पष्टपणे दिसून येतात.

म्हणूनच तुम्ही म्हणता की डियालो कुटुंबातील मुलांचा जगाशी परिचय वेगळ्या मार्गांनी झाला आहे. जग समजून घेण्याच्या त्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत; त्यांच्या तर्कशक्तीचे आधार वेगळे आहेत आणि त्यांच्या संवेदनशीलताही वेगळ्या आहेत.

आणखी एक बाब म्हणजे श्री. डियालो यांची धार्मिक, विशेषतः इस्लामी शिक्षणाशी असलेली बांधिलकी. आणि तुम्ही त्यांना वारंवार हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होता की फ्रेंच सार्वजनिक शिक्षणव्यवस्था आणि इस्लामी धार्मिक शिक्षण यांच्यात कोणताही विरोधाभास नाही; उलट ती एकमेकांशी सुसंगत ठरू शकतात.

याशिवाय, मुलांच्या शालेय भोजनव्यवस्थेचा खर्च कोण उचलणार, हाही एक प्रश्न होता. अर्थात, तुम्ही त्यांना मोठ्या प्रमाणात मदत केलीत, त्यांच्या पाठीशी उभे राहिलात; परंतु सर्व जबाबदाऱ्या स्वतःकडे घेण्याची तुमची इच्छा नव्हती. त्यामुळे या विषयावरही काही चर्चा झाल्या.

आणि मग, शेवटी एका अशा प्रसंगाचा उल्लेख करावासा वाटतो, ज्याने माझं विशेष लक्ष वेधून घेतलं.

तो म्हणजे नेत्रतज्ज्ञाकडे दिलेल्या भेटीचा प्रसंग.

तुम्ही लिहिता:

"शाळेत प्रवेश घेतल्यानंतर अनेक महिने लोटल्यानंतर आम्हाला असं आढळून आलं की लिंडा आणि जायाब यांना अक्षर आणि अंक यांतील फरक समजत नव्हता."

मारी-कारोलिन: शाळेच्या विषयाचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद.

पुस्तकात शाळेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कारण शाळेच्या माध्यमातूनच ही मुलं फ्रान्समधील एका सामायिक सामाजिक विश्वात प्रवेश करतात. मुलांच्या समावेशनाची प्रक्रिया फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणावर शाळेच्या चौकटीतूनच घडते. याच ठिकाणी त्यांची इतर मुलांशी भेट होते, मैत्री निर्माण होते. खरं तर, फ्रान्समध्ये आल्यानंतर बराच काळ सामाजिकदृष्ट्या अलिप्त राहिलेल्या या कुटुंबासाठी शाळाच समाजाशी जोडणारं प्रमुख माध्यम ठरली.

आणि माझ्याबाबतीत, तसेच माझ्या संपूर्ण कुटुंबाबाबतीत, एक गोष्ट विशेष महत्त्वाची आहे. आम्ही सर्वजण फ्रेंच सार्वजनिक शिक्षणव्यवस्थेत घडलो-वाढलो आहोत. त्यामुळे या सार्वजनिक शिक्षणव्यवस्थेबद्दल आमच्या काही ठाम अपेक्षा होत्या.

परंतु शाळेशी झालेल्या या अनुभवातून आम्हाला जाणवलं की आमच्या त्या अपेक्षांमध्ये अनेक पूर्वग्रह आणि पूर्वकल्पना मिसळलेल्या होत्या. आणि या मुलांच्या सहवासात मला सातत्याने नव्या गोष्टी शिकायला मिळत गेल्या, विचार करण्याच्या इतर पद्धती, वागण्याच्या इतर पद्धती, खेळण्याच्या इतर पद्धती; थोडक्यात, जगाशी संबंध प्रस्थापित करण्याचे अनेक वेगळे मार्ग.

उदाहरणार्थ, काही गोष्टी अशा असतात की त्या पूर्णपणे सांस्कृतिक संदर्भांशी जोडलेल्या असतात. लांडगा आणि कोकरू यांच्या गोष्टीचंच उदाहरण घ्या.

या मुलांच्या दृष्टीने ती गोष्ट पूर्णपणे अनोळखी आणि काहीशी अविश्वसनीय होती. त्या गोष्टीतलं बरंच काही त्यांना पटत नव्हतं.

सर्वप्रथम, तिचा बोध. विशेषतः मुलींना तो अजिबात रुचत नव्हता. त्या विचारत, "बलवानाचं म्हणणं नेहमीच खरं कसं असू शकतं?" त्यांच्यासाठी ही कल्पनाच अस्वस्थ करणारी होती. त्यांनी सैनिकांना कुटुंबांमध्ये घुसताना पाहिलं होतं. शस्त्रांच्या बळावर सर्वांत शक्तिशाली ठरणाऱ्यांचा अनुभव त्यांनी घेतला होता. मग अशा मुलांना आपण कसं सांगणार की "बलवानाचं म्हणणं नेहमीच खरं असतं" हा धडा त्यांनी शिकावा? त्यामुळे त्यांनी या गोष्टीवर खूप प्रश्न विचारले.

शिवाय, कोकरू ही प्रतिमाही त्यांना सहजपणे स्वीकारता येत नव्हती. बाप्तिस्म्याच्या वेळी एका कोकराचं बलिदान देण्यात आलं होतं, ही गोष्ट वेगळी; पण तरीही 'कोकरू' या प्रतिमेबद्दल त्यांना एक प्रकारची अस्वस्थता वाटत होती.

अशा प्रकारे, जाँ द ला फॉन्तेन  यांच्या या बोधकथेतील अनेक संदर्भ त्यांच्या अनुभवविश्वाशी जुळत नव्हते. त्यामुळे ती गोष्ट त्यांना काहीशी असह्यच वाटत असे. पण त्याच वेळी, या अनुभवातून आम्हालाही बरंच काही शिकायला मिळालं. आपल्या स्वतःच्या विचार करण्याच्या पद्धतींकडे नव्याने पाहण्याची संधी मिळाली.

कारण प्रत्येक मूल आपल्या स्वतःच्या संदर्भविश्वात वाढत असतं. जगाकडे पाहण्याची त्याची स्वतःची चौकट असते. आणि सांस्कृतिक भिन्नतेचं खरं सौंदर्य बहुधा याच ठिकाणी आहे.

मला हे सांगायला आवडेल की, या फरकांमध्येच खरी समृद्धी दडलेली आहे. आणि कुठेतरी, त्या अत्यंत नियमबद्ध ठिकाणी, नाहीतर हे शक्य झाले नसते. शाळा हे एक खूप प्रमाणित ठिकाण आहे. फ्रेंच सार्वजनिक शाळा ज्या पद्धतीने काम करतात, त्या पद्धती कधीकधी या मुलांच्या स्वभावाशी जुळत नाहीत. आणि त्यामुळे, तिथे काही प्रमाणात जुळवून घेण्याची गरज असते.

म्हणून, मला असे आढळते की, इथे हे रोमांचक सांस्कृतिक पूलसुद्धा आहेत. उदाहरणार्थ, जेव्हा शाळेत आम्ही या मुलांना अरबी शिकवण्याचा प्रस्ताव ठेवतो किंवा जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना विचारता की, त्यांचा आवडता केक कोणता आहे. आणि तिथेच, त्यांना फ्रेंच केक्सचा शोध लागतो. आणि ते काही नवीन पाककृती शिकतात. तर, खरंतर, हे सर्व छोटे छोटे अनुभव असतात. पण हे खरं आहे की, कधीकधी आम्ही अडकतो. उदाहरणार्थ, अक्षरे आणि अंकांच्या बाबतीत. इथे आम्ही एका खऱ्या कोड्यात अडकलो होतो. म्हणजे, अशा काही गोष्टी होत्या ज्यांचा त्यांना काहीच अर्थ लागत नव्हता. काही संकल्पना या मुलांसाठी इतक्या अनोळखी होत्या. पण असे का होते? मला माहीत नाही.

हळूहळू आम्हाला आणखी एक गोष्ट उमगली. या मुलांच्या काही कल्पना आणि आकलनाच्या पद्धतींमागे त्यांचा पूर्वानुभवही कारणीभूत होता. त्यांनी यापूर्वी औपचारिक शालेय शिक्षण फार कमी घेतलं होतं. यामागे त्यांच्या वडिलांच्या तुरुंगवासाची परिस्थिती होती. त्यामुळे त्यांना आपल्या आईसोबत सतत स्थलांतर करत राहावं लागलं होतं. तसेच, यांपैकी काही मुलांनी कुराणिक शाळांमध्येही शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे त्यांचा शिक्षणाचा अनुभव आणि शिकण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या.

परिणामी, या मुलांची जगाकडे पाहण्याची दृष्टी, त्यांची संवेदनशीलता आणि ग्रामीण जीवनाशी असलेलं त्यांचं नातं हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होतं. त्यांच्या सहवासात हे अनुभवणं खरोखरच विलक्षण होतं.

मात्र दुसरीकडे, अत्यंत नियमबद्ध आणि काटेकोर चौकटींमध्ये स्वतःला जुळवून घेणं त्यांच्यासाठी अनेकदा कठीण जात होतं. आणि याच गोष्टीमुळे आम्ही बराच काळ संभ्रमात होतो. नेमकं काय घडत आहे आणि त्याचा अर्थ कसा लावायचा, याबद्दल आमच्या मनात अनेक प्रश्न होते. इतकेच.

अनुबंध: धन्यवाद.

शिक्षण आणि मूल्यसंस्कारांचा प्रश्न हा फ्रान्समध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि मध्यवर्ती मानला जातो. आणि या संदर्भात, भारतातील परिस्थितीशी तुलना केली तर एक गोष्ट माझ्या लक्षात येते. मला आठवतं, आणि फ्रान्समध्ये अशा घटना घडतातही, की एखादी व्यक्ती मुलांना रागावताना म्हणते: "यात तुमचा दोष नाही. तुमच्या पालकांचा दोष आहे. त्यांनी तुम्हाला योग्य शिक्षण आणि योग्य मूल्यसंस्कार दिले नाहीत." अशा प्रकारची टिप्पणी मी भारतात कधी ऐकली होती, असं मला आठवत नाही. माझ्या अनुभवात, ती मला केवळ इथेच ऐकायला मिळाली.

आणि याच संदर्भात मला एक उदाहरण आठवतं.

तुम्ही पुस्तकात लिंडाशी संबंधित एका प्रसंगाचा उल्लेख केला आहे. बहुधा तिने मेट्रोचं तिकीट घेण्यास नकार दिला होता किंवा तशाच प्रकारची काही घटना घडली होती.

तेव्हा तुम्ही तिला विचारलं होतं :

"सार्वजनिक सेवा म्हणजे काय?"

झेनाबने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं :

"जी सर्वांसाठी असते."

"छान. एखादं उदाहरण सांगशील?"

"शाळा आणि मेट्रो."

"आणि ती चांगली गोष्ट आहे का?"

"हो. कारण ती सर्वांसाठी असते."

"मग ती व्यवस्थित चालावी म्हणून आपण प्रत्येकाने थोडासा वाटा उचलायला नको का? विशेषतः ती सर्वांच्या हिताची असेल तर?

गिनीमध्ये तुम्हाला अशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. इथे त्या आहेत. त्यामुळे त्यांचा आदर करणं आणि त्यांच्या कार्यात आपला वाटा उचलणं आवश्यक आहे."

बरं, मला हा संवाद अत्यंत रंजक वाटला.

कारण काही वर्षांपूर्वी, म्हणजे आता जवळजवळ वीस वर्षांपूर्वी- मी लील येथे शिक्षण घेत असताना, तिथेही मला असे विद्यार्थी भेटले होते जे मेट्रोचं तिकीट काढण्यास तयार नसत. आणि त्या वेळी मला असं वाटायचं की, भारतातील अनेक शहरांच्या तुलनेत लील हे किती लहान शहर आहे. तरीही तिथे मेट्रोची सुविधा उपलब्ध आहे. त्या काळी भारतात अनेक ठिकाणी अशी सुविधा नव्हती. म्हणूनच ती व्यवस्था टिकून राहावी आणि सुरळीतपणे चालावी यासाठी आपण प्रत्येकाने आपला वाटा उचलणं आवश्यक आहे. त्यामुळे, या बाबतीत तुमच्या विचारांतही मला हाच दृष्टिकोन दिसून येतो.

कृपया त्या संवादाविषयी काही सांगाल का?

मारी-कारोलिन: तो संवाद खरोखरच सुंदर होता.

कारण इथे आपण लिंडाबद्दल बोलत आहोत. लिंडा किशोरवयीन मुलगी होती. त्या वयात असणारा थोडासा खोडकरपणा, थोडासा बंडखोर स्वभाव तिच्यातही होता. अर्थात, तो निरुपद्रवी स्वरूपाचा होता. आणि खरं म्हणजे, मूल्यसंस्कारांचा प्रश्न सतत समोर येत असे. उदाहरणार्थ, आपण कागद जमिनीवर फेकत नाही. एखादी कृती पूर्ण झाल्यानंतर आपली जागा आवरून ठेवतो. इतरांशी सौजन्याने आणि जपून वागतो. सार्वजनिक मालमत्ता आणि सार्वजनिक सेवांचा आदर करतो.

मला असंही वाटतं की सार्वजनिक जागांविषयीचं शिक्षण प्रत्येक देशात वेगळ्या प्रकारे दिलं जातं. माझ्या मते, आज मुलांना हे शिकवण्याचा प्रयत्न केला जातो. विशेषतः शाळेत, सामायिक सार्वजनिक अवकाश म्हणजे काय, त्याच्याशी निगडित जबाबदाऱ्या कोणत्या, याची जाणीव मुलांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न असतो.

पण या मुलांसाठी परिस्थिती वेगळी होती. ते एका नव्या सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणात आले होते. त्यामुळे या गोष्टी त्यांना आपोआप समजणं शक्य नव्हतं.

म्हणूनच आमच्या आणि या मुलांच्या अनेक चर्चा होत असत. आणि त्यातली सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे त्या खऱ्या अर्थाने चर्चा असत. केवळ नियम समजावून सांगण्याचा किंवा उपदेश करण्याचा तो प्रकार नव्हता. आम्ही त्यांच्यासोबत विचार करू शकत होतो. एखाद्या प्रश्नाचा एकत्रितपणे विचार करू शकत होतो. हाच त्या संवादांचा सर्वांत मौल्यवान पैलू होता.

ही मुलं सार्वजनिक अवकाशाच्या एका वेगळ्याच स्वरूपाशी परिचित होत होती. जगाकडे पाहण्याची, त्याचा अर्थ लावण्याची एक वेगळी पद्धत ती शिकत होती. शिवाय, फ्रान्समधील सार्वजनिक अवकाश तुलनेने सुव्यवस्थित आणि सुरक्षित आहे. यासंदर्भात आणखी एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे. माझ्या सल्लामसलतीसाठी अनेकदा इतर देशांतून आलेले लोक येत असतात. त्यांपैकी बरेच जण अशा देशांतून आलेले असतात, जिथे राजकीय अस्थिरता किंवा विविध प्रकारच्या अडचणी दीर्घकाळ राहिलेल्या असतात. अशा परिस्थितीत शासनाविषयी मोठ्या प्रमाणात अविश्वास निर्माण झालेला असतो. सार्वजनिक सेवांविषयीही तितकाच अविश्वास असतो. कारण अनेकदा त्या सेवा नीट कार्यरत नसतात, किंवा त्यांच्याशी भ्रष्टाचार जोडलेला असतो, अथवा एकूणच राज्यसंस्था विश्वासार्ह वाटत नाही.

त्यामुळे ज्या देशात, तत्त्वतः तरी, राज्यसंस्था कार्यरत आहे, सार्वजनिक सेवा चालतात आणि काही प्रमाणात त्यांच्यावर विश्वास ठेवता येतो, अशा देशात आल्यावर अनेकांना ते सुरुवातीला काहीसं अनपेक्षित, किंबहुना विचित्र वाटू शकतं.

कोणत्याही परिस्थितीत, राज्याकडून काही अपेक्षा असतात. गोष्टी व्यवस्थित चालतील, सार्वजनिक सेवा नीट कार्यरत असतील, अशी अपेक्षा आपण करतो. कारण करदाते त्यासाठी योगदान देत असतात. पण प्रत्यक्षात, अनेक कुटुंबांसाठी ही कल्पनाच काहीशी अपरिचित असते. आणि हा एक महत्त्वाचा फरक आहे, जो आपण अनेकदा पूर्णपणे विसरून जातो.

म्हणजेच, सार्वजनिक सेवा आणि राज्य यांच्याविषयीच्या अपेक्षा एका समाजातून दुसऱ्या समाजात खूपच भिन्न असू शकतात. काही ठिकाणी त्यांच्याबद्दल अधिक अविश्वास असतो. विशेषतः जेव्हा एखादी व्यक्ती अशा देशातून आलेली असते जिथे राज्य भ्रष्ट मानलं जातं किंवा सार्वजनिक व्यवस्था नीट कार्यरत नसते.

त्यामुळे इथे काही विसंगती किंवा गैरसमज निर्माण होणं स्वाभाविक आहे. अर्थात, यामागे कौटुंबिक मूल्यांतील आणि संगोपनातील भिन्नतांचाही मोठा वाटा असतो. कारण प्रत्येक समाज आपल्या मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असतो. उदाहरणार्थ, ही मूल्ये एखाद्या मुलाला किंवा तरुणाला, आपण फ्रान्समध्ये जे शिकतो त्यापेक्षा खूप जास्त धूर्त बनायला शिकवू शकतात. आपण आदर करायला किंवा आपली नागरिक कर्तव्ये पार पाडायला शिकतो, तुम्हाला माहीत आहेच. त्यामुळे या सर्व गोष्टी आमच्या चर्चांचे वारंवार विषय बनत गेल्या.

अनुबंध: ठीक आहे. अगदी बरोबर. भारत, आफ्रिका आणि इथे फ्रान्समधील समूहवाद आणि शासनाशी असलेले संबंध पूर्णपणे भिन्न आहेत. आणि नेमके याच कारणामुळे मला या वेगवेगळ्या संस्कृतींचा संगम खूप, खूप आकर्षक वाटतो!

आता या चर्चेचा समारोप करताना मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आज त्या कुटुंबाची परिस्थिती काय आहे? उदाहरणार्थ, ते कुटुंब आज कुठे आहे? ती मुलं आता काय करत आहेत? त्यांच्याशी तुमचा संपर्क अजूनही कायम आहे का? तुमच्या भेटीगाठी आणि परस्परसंबंध कसे आहेत? आणि पुढील काळाबद्दल त्यांच्यासमोर कोणत्या शक्यता आणि संधी आहेत?

एकूणच, आज त्यांचं आयुष्य कसं चाललं आहे?

मारी-कारोलिन: आई-वडील आणि लहान मुलं अजूनही एकत्र राहतात. त्यांना सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत निवास मिळाला आहे. घर फार मोठं नाही; मात्र ते अतिशय सोयीस्कर ठिकाणी, जुविझीच्या परिसरात आहे. सर्व मुलं शाळेत जात आहेत. विशेषतः लहान मुलांचं शिक्षण व्यवस्थित सुरू आहे आणि त्यांनी लक्षणीय प्रगती केली आहे. याशिवाय, मुलांनी अनेक नव्या उपक्रमांचा परिचय करून घेतला आहे. उदाहरणार्थ, क्रीडा. लहान बाला आता उत्तम पोहतो. तो आठवड्यातून तीन वेळा पोहण्याच्या सरावासाठी जातो. हे सांगताना मला गंमत वाटते, कारण पुस्तकात मी जलतरण तलावातील त्यांच्या सुरुवातीच्या अनुभवाबद्दल लिहिलं आहे. त्या अनुभवाच्या प्रारंभी त्यांना किती अडचणी आल्या होत्या, याचाही मी उल्लेख केला आहे.

आणि मग, मला असं म्हणावंसं वाटतं की पौगंडावस्थेच्या मधल्या टप्प्यात असलेल्यांसाठी हा बदल अधिक गुंतागुंतीचा होता. उदाहरणार्थ, लिंडा आणि मोठी हवाई यांच्यासाठी. हवाई अजूनही फ्रान्समध्ये आहे, आपल्या पती आणि मुलाच्या आगमनाची व्यवस्था करण्याच्या आशेने. तिने त्यांना गेल्या ३ वर्षांपासून पाहिलेलं नाही. ते घडून यावं यासाठी ती प्रयत्न करत आहे. त्यामुळे, हे एक कौटुंबिक पुनर्मिलन ठरेल. हे तिच्यासाठी अधिक समस्यापूर्ण असू शकतं.

आणि मग लिंडा. आठवी पूर्ण केल्यानंतर लिंडाने व्यावसायिक प्रशिक्षणाचा मार्ग निवडला. आणि आता, वर्षाच्या अखेरीस म्हणजे जून महिन्यापासूनच ती त्या प्रशिक्षणाला सुरुवात करणार आहे. ती परिचारिका सहाय्यक पदविकेचं शिक्षण घेणार आहे. फ्रान्समध्ये ही एक चांगली आणि मान्यताप्राप्त व्यावसायिक पात्रता मानली जाते.

या प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया तिने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आणि तिचं एक स्वप्न आहे, जे मला अतिशय सुंदर वाटतं. एक दिवस बारावीची परीक्षा देऊन त्यात यश मिळवायचं, अशी तिची इच्छा आहे. मला हे खरोखरच विलक्षण वाटतं. आणि ती ते नक्की साध्य करेल, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे.

एकूणच, हे एक असं कुटुंब आहे ज्याची वाटचाल सकारात्मक दिशेने सुरू आहे..हे कुटुंब पुढे जात आहे, प्रगती करत आहे. त्यांच्या आईला आता वाचता आणि लिहिता येतं. फ्रान्समध्ये आल्यावर फातिमाला ते जमत नव्हतं. त्यामुळे हे असं कुटुंब आहे की ज्यांनी फ्रान्समधील समावेशनाच्या प्रक्रियेदरम्यान त्यांच्यासमोर उभ्या राहिलेल्या विविध संधींचा पुरेपूर लाभ घेतला. आणि आज त्यांच्या प्रवासाकडे पाहिलं, तर त्या प्रयत्नांची फळं स्पष्टपणे दिसून येतात.

अर्थात, हे सर्व कोणत्याही अडचणींशिवाय घडलेलं नाही. उदाहरणार्थ, इतक्या मोठ्या कुटुंबासाठी त्यांचं उत्पन्न अजूनही मर्यादित आहे; आर्थिक अडचणी अजूनही आहेत आणि काही प्रश्न अद्याप कायम आहेत. परंतु दुसरीकडे, या अनुभवातून फ्रान्स एखाद्या कुटुंबाला काय देऊ शकतो, याचीही एक झलक दिसते. रोजगार, शिक्षण, आणि मुलांना स्वतःचं भविष्य घडवण्याची संधी.

मला हे अत्यंत समाधानकारक वाटतं. मोठी मुलंसुद्धा आपापल्या मार्गाने पुढे जात आहेत.

त्यामुळे, एकंदरीत पाहता, हा प्रवास बराच यशस्वी ठरला असं मला वाटतं. सुरुवातीचा काळ काहीसा खडतर आणि चढउतारांनी भरलेला होता, हे खरं; पण तरीही या कुटुंबासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी तो एक अत्यंत सुंदर सामायिक अनुभव ठरला.

आणि हो, आमचा त्यांच्याशी अजूनही नियमित संपर्क आहे. उदाहरणार्थ, नुकत्याच ईस्टरच्या सुट्ट्या आम्ही सर्वांनी एकत्र घालवल्या. विशेषतः मुलांच्या बाबतीत एक गोष्ट जाणवते, ते जेव्हा जेव्हा या घरी येतात, तेव्हा ते स्वतःच्या घरात आल्यासारखेच वावरतात. या घराशी आणि या वातावरणाशी त्यांचं एक अतिशय जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं आहे. या घराबद्दल त्यांना विशेष आपलेपणा वाटतो.

अनुबंध: ठीक आहे. धन्यवाद.

आणि त्यांनी हे पुस्तक वाचले आहे का? वाचले असेल, तर त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय आहे?

मारी-कारोलिन: हो, अर्थात त्यांनी हे पुस्तक वाचले आहे. विशेषतः मुलींनी. या पुस्तकाचं सर्वाधिक वाचन करणाऱ्या मुली म्हणजे लिंडा आणि झेनाब.

या अशा मुली आहेत ज्या पुस्तके आवडीने वाचतात आणि या पुस्तकाचा त्यांनी खरोखर आनंद घेतला.

आणि त्यांनी मला एक असा प्रश्न विचारला ज्याने मला थोडंसं अडचणीत टाकलं..हाहा!

त्या म्हणाल्या: "तुम्ही आमची पहिली नावं का बदलली?"

मी त्यांना सांगितलं की कदाचित गोपनीयता राखावी, अशी माझी कल्पना होती.

पण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं:

"नाही, खरं तर आम्हाला आमची खरी नावंच वापरलेली आवडली असती."

मला ही प्रतिक्रिया खूपच छान वाटली. .

अनुबंध: उत्तम!

समारोप करण्यापूर्वी, मी आपला संवाद थोडा व्यापक पातळीवर न्यायचा आहे, जेणेकरून तो भारतातील किंवा कदाचित ब्राझीलमधील प्रेक्षकांसाठीही सुसंगत ठरेल.

स्थलांतरितांच्या स्वीकारासंदर्भातील हा संपूर्ण विषय अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीचा आहे, हे आपल्याला ठाऊक आहे. सर्वप्रथम, आपण 'इमिग्रंट्स' किंवा स्थलांतरित लोकांविषयी बोलताना काळजी घेतली पाहिजे, कारण अनेकदा त्यांना समाजात कलंकित केलं जातं.

भारतातही आपण हे पाहतो. उदा. रोहिंग्या किंवा इतर (जसे की बांगलादेशातून आलेले) स्थलांतरित. यांच्या संदर्भात विविध सामाजिक आणि राजकीय चर्चा होत असतात. तसंच, नागरिकत्व सुधारणा कायदा (Citizenship Amendment Act) यावरही मोठ्या प्रमाणात वादविवाद झाले आहेत.

फ्रान्समध्येही आपण हे ऐकतो, विशेषतः उजव्या विचारसरणीच्या राजकारणात. उदाहरणार्थ, मरीन ले पेन यांनी असं विधान केलं आहे की:

"आपण (फ्रान्स) जगातील सर्व दुःख-दुर्दशा स्वीकारू शकत नाही!"

मग या सर्व गोष्टी आपण एका व्यापक संदर्भात कशा समजून घ्यायच्या? एखाद्या देशाचा वसाहतवादी भूतकाळ असो किंवा नसो, या गोष्टींचा विचार करताना आपण काय दृष्टीकोन ठेवायचा? विशेषतः त्या देशांची आणि सरकारांची सामूहिक जबाबदारी लक्षात घेऊन, ज्यांनी काही प्रमाणात त्या देशांमध्ये निर्माण झालेल्या कठीण परिस्थितींना सुरुवात केली किंवा त्यात भूमिका बजावली, हे आपण कसे पाहायचे?

आणि आजच्या परस्परावलंबी जगात, ही जबाबदारी आणखी अधिक गुंतागुंतीची होते, हेही लक्षात घ्यायला हवं.

आणि त्याचबरोबर मानवी पातळीवर, नागरिक पातळीवर, आपल्या समाजात, आपल्या देशात स्थलांतरितांचे आगमन आणि त्यांचे स्वागत याकडे आपण पुनर्संदर्भात कसे पाहू शकतो?

मारी-कारोलिन: तर, तुम्ही खूप मोठे प्रश्न विचारले आहेत, ज्यांची मी थोडक्यात उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. मरीन ले पेन यांचं हे विधान प्रत्यक्षात मूळात माजी फ्रेंच पंतप्रधान मिशेल रोकार यांनी केलेलं विधान आहे. त्या काळात त्यांच्या वाक्याला दोन भाग होते. ते म्हणाले होते:

"आपण जगातील सर्व दुःख-दुर्दशा स्वीकारू शकत नाही; पण प्रत्येकाने आपापला वाटा उचललाच पाहिजे."

म्हणजेच, मूळ विधान हे असे होते.

आणि आजच्या काळात, तुम्ही अतिशय योग्यरीत्या म्हटलंत. आज आपण अतिशय तीव्र राजकीयकरणाच्या वातावरणात जगत आहोत. आणि हे वातावरण अनेकदा माध्यमांतील सनसनाटीपणा, तसेच चुकीच्या किंवा अतिशयोक्त माहितीमुळे अधिकच विकृत होत जातं. 'मोठ्या प्रमाणातील लोंढा', 'आक्रमण', 'सतत येणारा स्थलांतरितांचा प्रवाह' अशा शब्दांमुळे वास्तवाचं चित्र अनेकदा पूर्णपणे बिघडून जातं.

प्रत्यक्ष वास्तव मात्र वेगळं आहे. हो, स्थलांतर ही प्रक्रिया आजही सुरूच आहे. ती जगभरातील एक अत्यंत महत्त्वाची सामाजिक घटना आहे. इतिहासात नेहमीच मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत राहिलं आहे. आणि खरं तर, हे असं घडणं हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्यातूनच जग घडत गेलं आहे.

व्यापार, जागतिक अर्थव्यवस्था, सांस्कृतिक देवाणघेवाण, सांस्कृतिक विविधता या सगळ्याची मुळे या हालचालींमध्येच आहेत. त्यामुळे हो, ही प्रक्रिया आजही सुरूच आहे.

हो, स्थलांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, पण त्या 'प्रचंड लोंढे' या अर्थाने नाहीत. आणि प्रत्यक्षात आपण विशेषतः उत्तर गोलार्धातील देश, म्हणजे फ्रान्स या प्रक्रियेचा तुलनेने कमी अनुभव घेतो. स्थलांतराचा बहुतांश भाग हा प्रत्यक्ष संकटग्रस्त देशांच्या शेजारील प्रदेशांमध्येच घडतो. त्यामुळे हे स्पष्टपणे लक्षात घ्यायला हवं की स्थलांतराचा मोठा भार दक्षिण गोलार्धातील किंवा संघर्षग्रस्त देशांच्या अगदी शेजारी असलेल्या देशांवर पडतो.

उदाहरणार्थ, सीरियातील परिस्थितीमुळे जॉर्डन, लेबनॉन यांसारखे देश मोठ्या प्रमाणात त्या परिणामांचा सामना करतात. म्हणजेच, जिथे संकटं आहेत, तिथून जवळच्या देशांमध्येच प्रत्यक्ष स्थलांतराचं केंद्रीकरण होतं. कारण दूरवर स्थलांतर करण्यासाठी वेगळ्या प्रकारची साधनसंपत्ती, मार्ग आणि क्षमता आवश्यक असते.

त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. फ्रान्समध्ये काही राजकीय प्रवाह 'किल्लेवजा(बंद) युरोप' ही संकल्पना पुढे रेटतात. मात्र अशा धोरणांचा प्रत्यक्ष फायदा होत नाही; उलट त्यामुळे समुद्रातील मृत्यूंसह अनेक मृत्यू वाढतात.

कारण वास्तव असं आहे की लोकांना निघावं लागलं, तर ते निघतातच. आणि जेव्हा त्यांना दूर जायचं असतं, तर ते मोठा धोका पत्करूनही करतात, कधी कधी जीव गमावण्याचा धोका असतानाही. त्यामुळे जितक्या अधिक भिंती उभ्या केल्या जातात, तितके अधिक मृत्यू होतात; परंतु स्थलांतर मात्र थांबत नाही. म्हणूनच या प्रश्नावर वेगवेगळे दृष्टिकोन आणि राजकीय भूमिका दिसून येतात.

मात्र जर आपण थोडं शुद्ध आर्थिक आणि लोकसंख्यात्मक दृष्टिकोनातून पाहिलं, तर युरोपला स्थलांतर पूर्णपणे मर्यादित करण्यात फारसा फायदा नाही. उलट काही प्रमाणात ते स्वीकारण्यातच दीर्घकालीन हित आहे. कारण काही दशकांनंतर आपल्याला तरुण लोकसंख्येची कमतरता आणि कामगारांची टंचाई भासणार आहे, हे वास्तव आहे.

त्यामुळे व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिलं, तर समावेशन, नियमितीकरण आणि प्रशिक्षण यांवर आधारित नीती अधिक परिणामकारक ठरते. जशी स्पेन काही प्रमाणात राबवत आहे. म्हणजेच, लोकांना व्यवस्थेत समाविष्ट करून त्यांना कामाच्या संरचनेत आणणं हे अधिक उपयुक्त ठरतं.

मी हेही लक्षात आणून देते की माझ्या सल्लामसलतीदरम्यान मला असा एकही रुग्ण भेटलेला नाही खरं तर , जो तीव्रपणे, अगदी ठामपणे, आपले कर भरण्याची इच्छा व्यक्त करत नाही. आणि मी कर भरण्याचा उल्लेख मुद्दाम करते, कारण त्यांच्यासाठी ते एक प्रकारचं प्रतीक असतं. आपण समाजात समाविष्ट झालो आहोत याचं.

कर भरताना त्यांना असं वाटतं की ते राज्यव्यवस्थेत समाविष्ट झाले आहेत. काही वेळा तर ही भावना अधिक तीव्र असते, कायदेशीर कागदपत्रांपेक्षाही. कारण कर भरताना आपण अर्थव्यवस्थेचा भाग झालो आहोत, ही जाणीव त्यांना अधिक ठळकपणे जाणवते.

त्यामुळे ते स्पष्टपणे सांगतात: “मला कर भरायचे आहेत.”

ही एक अत्यंत ठळक आणि अर्थपूर्ण प्रतिक्रिया आहे.

त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या काळात, दुर्दैवाने, या प्रकारच्या राजकीय चर्चांमुळे आणि धोरणात्मक भूमिकांमुळे आपण प्रत्यक्ष वास्तवातील मुद्दे पाहू शकत नाही. आपण तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्याची क्षमता गमावत चाललो आहोत. उलट, स्थलांतराच्या प्रश्नाकडे पाहताना, माझ्या मते, खरा मुद्दा समावेशनाचा आहे. जर आपण एक सुसंगत समावेशन धोरण विचारात घेतलं, तर आपल्याला या लोकांच्या कौशल्यांचाही विचार करावा लागेल. कारण अनेक स्थलांतरित विविध प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये कार्यरत आहेत.

म्हणूनच, आर्थिक दृष्टिकोनातून शांतपणे आणि वस्तुनिष्ठपणे विचार करणं आवश्यक आहे. आपल्याला कुशल कामगारांची गरज आहे, तसेच कमी कौशल्याच्या कामांचीही गरज आहे, विशेषतः ज्या क्षेत्रांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. सुदैवाने, आपल्याकडे अशा प्रकारचे स्थलांतर आहे जे मध्यम आणि उच्च कौशल्य दोन्ही स्तरांवर उपलब्ध आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आपला एकच हितसंबंध आहे, या स्थलांतरित लोकसंख्येला योग्य प्रकारे समाविष्ट करणं. परंतु दुर्दैवाने, चुकीच्या किंवा अतिशयोक्तीपूर्ण राजकीय भाष्यामुळे आपण त्या दिशेने पुरेसं काम करू शकत नाही.

म्हणून, मी ‘मायग्रेशन कन्वर्जन्स इन्स्टिट्यूट’ची संचालक म्हणूनही काम पाहते, जी संस्था फ्रान्समध्ये अनेक प्रमुख संशोधन संस्थांना एकत्र आणते. जसे की राष्ट्रीय वैज्ञानिक संशोधन केंद्र (CNRS), राष्ट्रीय आरोग्य व वैद्यकीय संशोधन संस्था (INSERM), सामाजिक विज्ञानातील उच्च अध्ययन विद्यालय (EHESS), तसेच PHE इत्यादी.

एकूणच, या आठ मोठ्या फ्रेंच संशोधन संस्थांतील सुमारे ८०० संशोधक या विषयावर काम करत आहेत.

आजच्या संशोधनाचा एकच मूलभूत मुद्दा असा आहे की सार्वजनिक चर्चांमध्ये विशेषतः राजकीय भाषणांमध्ये, जिथे या प्रश्नाची मांडणी अनेकदा विकृत स्वरूपात केली जाते, तेथे हे पुन्हा पुन्हा अधोरेखित करणे आवश्यक आहे की जर आपण वस्तुनिष्ठ, तटस्थ आणि कार्यक्षम पद्धतीने विचार केला, तर स्थलांतर ही घटना प्रत्यक्षात आपल्या देशासाठी अत्यंत लाभदायक ठरते.

त्याशिवाय, तुम्ही आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे, तो म्हणजे नागरिकांच्या दृष्टिकोनाचा.

फ्रान्समध्ये आश्रयाचा अधिकार (right to asylum) अस्तित्वात आहे. आपल्याकडे आश्रयाच्या हक्काची एक ठोस व्यवस्था आहे; मात्र आज या व्यवस्थेला अनेक प्रकारचे धक्के बसलेले दिसतात, जरी त्यामागे कोणताही वाईट हेतू नसला तरीही.

मी येथे त्या सर्व मोठ्या आश्रय प्रशासनाशी संबंधित कायदेशीर संस्थांचा उल्लेख करते ज्याबद्दल आपण बोलत होतो. कारण न्यायव्यवस्थेत प्रलंबित प्रकरणांचा साठा आहे, तसेच काही वेळा संसाधनांची कमतरताही भासते. काही बाबी आहेत ज्यांचे पुनरावलोकन आणि अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे, असे मला वाटते.

उदाहरणार्थ, आश्रय अर्ज कसा ऐकायचा, विविध सार्वजनिक सेवा संस्थांमध्ये समन्वय कसा साधायचा, या सर्वांवर अधिक एकत्रित पद्धतीने काम करणे आवश्यक आहे.

मला असंही वाटतं की सार्वजनिक सेवांनी, उदाहरणार्थ रुग्णालयांनी जे अशा व्यक्तींशी अनेकदा संपर्कात येतात, कधी कधी मध्यस्थाची भूमिका बजावली पाहिजे. ते असे सांगू शकतात की, “या व्यक्तीला तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यात अडचण येऊ शकते, कारण ती/तो अत्यंत गुंतागुंतीच्या मानसिक अवस्थेत आहे.”

अशा प्रकारचा दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे, असे मला वाटते.

एकूणच, ही संपूर्ण प्रक्रिया अधिक सकारात्मक आणि रचनात्मक पद्धतीने हाताळली पाहिजे. कारण स्थलांतर ही एक सामाजिक घटना आहे. ती शतकानुशतके सुरू असलेली प्रक्रिया आहे आणि जर आपण तिला वादाचा विषय बनवला नाही, तर ती आपल्या समाजासाठी लाभदायक ठरू शकते. परंतु ज्या क्षणी ती वादग्रस्त बनते, नैतिक मूल्यांच्या पातळीवर किंवा आर्थिक चर्चांच्या पातळीवर, त्या क्षणी आपण तिच्या नैसर्गिक प्रवाहाचा लाभ घेऊ शकत नाही, आणि ते खरोखरच दुर्दैवी ठरते.

अनुबंध: अगदी बरोबर. मी म्हणेन की आर्थिक, सामाजिक आणि अगदी सांस्कृतिक स्थलांतराची आवश्यकता अगदी स्पष्ट आणि आवश्यक आहे. हा केवळ राज्य किंवा प्रशासकीय स्तरावरील मान्यतेचा प्रश्न नाही, तर तो तितकाच सामाजिक स्तरावर, लोकांच्या स्तरावरील मान्यतेचा आहे.

तर, खूप खूप धन्यवाद. आता, मी तुमच्या पुस्तकातील मला आवडलेला एक शेवटचा उतारा वाचून दाखवू इच्छितो आणि त्याद्वारेच आपल्या चर्चेचा समारोप करू इच्छितो. आणि त्यानंतर, तुम्ही त्याबद्दल तुमचे विचार मांडू शकता.

हा शेवटचा उतारा अत्यंत प्रभावी आहे. तो मनोआघात (psycho-trauma) आणि अतिजागरूकता (hypervigilance) या अवस्थांवर प्रकाश टाकतो.

मी स्वतःला विचारते की, या आज्ञाधारक आणि शांत मुलांमध्ये दुष्टता' नेमकी कुठे असते?”

त्यांनी आपल्या पालकांचा दीर्घकाळ चाललेला दुःखद अनुभव पाहिला आहे, जवळपास पाच वर्षांहून अधिक काळ त्यांचे पालक एकमेकांपासून दूर राहिलेले होते.

त्यांनी अशा परिस्थितीचा अनुभव घेतला आहे, जिथे खोलीच त्यांच्यावर कोसळत असल्यासारखी वाटते—शत्रुत्वपूर्ण देशात अडकलेल्या अवस्थेची ती तीव्र जाणीव.

त्यांनी पाहिलं आहे की त्यांचे वडील आता आईच्या नजरेला थेट सामोरे जाण्याचं धाडसही करू शकत नाहीत.

त्यांनी आईच्या नजरेत रागही पाहिला आहे आणि भीतीही.

या सर्व अनुभवांमुळे ती मुलं एकाच वेळी खूप लवकर प्रौढ झाली.

फ्रान्समधील आश्रयव्यवस्थेने त्यांना निश्चिंत बालपणासाठी आवश्यक असलेली सुरक्षित चौकट देण्याऐवजी, त्यांना निर्वासनाच्या गुंतागुंतीच्या वास्तवाकडे अधिक जवळ नेलं.

अनेकदा असे घडते की, त्यांच्या बालसुलभ संवादाच्या मध्यावर, जिथे त्यांच्या डोळ्यांत खेळण्याची, आनंदाची, उत्साहाची चमक दिसू लागते, तिथे एखाद्या प्रौढाच्या एका शब्दाने ते अचानक थांबतात.

त्यांना त्या अपरिहार्य मर्यादेची जाणीव असते, जी त्यांच्या पालकांकडून सतत अधोरेखित केली जाते: अराजकता.

आणि मग ते आतून आकसतात.

त्यांच्या डोळ्यांतील तेज जणू एखाद्या काळ्या पडद्यामागे झाकोळून जातं.

ते अनेकदा धोक्यासमोर असलेल्या प्राण्यासारखे भासतात, ज्यांची सर्व इंद्रिये सतत सतर्क अवस्थेत असतात.

मानसआघातशास्त्रात यालाच 'अतिसतर्कता (Hypervigilance)' असे म्हणतात.'

तर, हे मानसिक आघाताबद्दल आणि अतिसतर्कताबद्दल आहे. 

मारी-कारोलिन: कदाचित हाच घटक या संपूर्ण कथानकाला आकार देणारा ठरतो, आणि सर्वसाधारणपणे विचार केल्यास, ज्या पिढ्यांना या धोक्यासोबत जगावे लागते, त्या पिढ्या टिकून राहिल्या आहेत. स्वागत न होण्याचा आणि हिंसेचाही धोका. पुन्हा एकदा, आपण राजकीय हिंसेबद्दल बोलत आहोत. ही मानवी हिंसेची कृत्ये आहेत, जी जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट थांबवतात, जी म्हणजे संवेदनशीलता, आश्चर्य, आणि नेमकी हीच गोष्ट मुले इतक्या प्रकर्षाने समोर आणतात. मला असे म्हणायचे आहे आणि माझा विश्वास आहे की, स्थलांतराच्या या मोठ्या मुद्द्यावरही आपण यावर विचार करू शकतो. व्यापक अर्थाने, आपण आपल्या पुढच्या पिढीला काय शिकवत आहोत? मला आशा आहे की ती अधिक मोकळ्या मनाची असेल, जी कुठेतरी भेटीगाठींचे, सांस्कृतिक भेटीगाठींचे, सामाजिक भेटीगाठींचे सौंदर्य जपेल. मला तशी आशा आहे, इतकंच.

अनुबंध: हे पुस्तक लिहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

कारण ही गोष्ट सोपी नसावी, विशेषतः तुम्ही स्वतः या कथानकातील एक प्रमुख व्यक्ती असूनही. तरीही तुम्ही गोष्टींकडे थोड्या अंतराने पाहू शकलात, हे खरोखरच प्रशंसनीय आहे. या पुस्तकाच्या रूपाने तुम्ही आम्हाला एक अतिशय सुंदर भेट दिली आहे.

माझ्याशी बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आशा आहे की हा संवाद पुढेही सुरू राहील. मनःपूर्वक आभार.

मारी-कारोलिन: खूप खूप धन्यवाद. तुमच्या अप्रतिम वाचनाबद्दल आणि ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. ही माझ्यासाठी खरोखरच एक प्रचंड आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट होती.

अनुबंध: मनापासून धन्यवाद. मला आशा आहे की वाचकांना हे पुस्तक आवडेल आणि ते स्वतः हा अनुभव जगतील, अनुभवतील.

 


 

मारी-कारोलिन सालिओ - यात्झमिर्स्की


मारी-कारोलिन साग्लिओ-यात्झिमिर्स्की या मानववंशशास्त्रज्ञ आणि क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ आहेत. त्या INALCO (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल लँग्वेजेस अँड सिव्हिलायझेशन्स) येथे प्राध्यापक आणि कन्व्हर्जन्स मायग्रेशन्स इन्स्टिट्यूट (CNRS - नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च) च्या संचालक आहेत. त्या CESSMA प्रयोगशाळेत (सेंटर फॉर सोशल सायन्स स्टडीज ऑन आफ्रिकन, अमेरिकन, अँड एशियन वर्ल्ड्स) संशोधक देखील आहेत.

गेली १५ वर्षे, मारी-कारोलिन यांनी अविसेन हॉस्पिटल (बोबिग्नी) येथील मनोआघात क्लिनिकमध्ये निर्वासितांसोबत काम केले आहे. त्यांचे कार्य विशेषतः भारत, ब्राझील आणि फ्रान्समधील स्थलांतर समस्या आणि सामाजिक बहिष्कारावर केंद्रित आहे.

फ्रेंच, इंग्रजी आणि पोर्तुगीज भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या सुमारे दहा अभ्यासपूर्ण पुस्तकांच्या लेखिका असलेल्या त्यांनी, विशेषतः आघात, भाषा, हिंसा आणि निर्वासित जीवन यांच्यातील संबंधांवर संशोधनाचे दिग्दर्शन किंवा प्रकाशन केले आहे. त्यांच्या अलीकडील कामांमध्ये 'द व्हॉइस ऑफ दोज हू क्राय आऊट: ॲन एन्काउंटर विथ असाईलम सीकर्स' (अल्बिन मिशेल, २०१८), 'व्हायोलन्स अँड नॅरेशन: स्पीकिंग, ट्रान्सलेटिंग, ट्रान्समिटिंग जेनोसाइड अँड एक्झाइल' (हर्मन, २०२०), आणि 'लिंगुआ (नॉन) ग्राटा: लँग्वेजेस, व्हायोलन्स, अँड रेझिस्टन्स इन द स्पेसेस ऑफ मायग्रेशन' (इनाल्को, २०२२) यांचा समावेश आहे. आणि सर्वात अलीकडे, निर्वासितांसाठीच्या पाहुणचाराच्या समकालीन अनुभवांना समर्पित असलेले 'फॅमिली रियुनियन' (ऑब, २०२६) हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

 

No comments:

Post a Comment

Family Reunion - Italian