Friday, November 26, 2021

कवींचे घर - La Finca de Los Poetas

तुम्ही कधी गुहेत झोपला आहात का? मला वाटते की तुम्हाला किमान हे नक्कीच आठवत असणार की आपल्या शालेय पुस्तकांत प्रागैतिहासिक मानव गुहांमध्ये कसा राहायचा याचा उल्लेख होता. मला तरी गुहेच्या अनुभवाबद्दल एवढेच माहीत होते. तथापि, माझा मित्र बातिस्त याच्या आग्रही आमंत्रणाने मला अलीकडेच स्पॅनिश कॅनरीज बेटावर (ग्रॅन कॅनरिया) एक महिना गुहेत राहण्याची अनोखी संधी मिळाली!  घरून काम (Work from Home) करण्याचे रुपांतर सहजतेने गुहेतून काम (Work from a Cave) करण्यात झाले..... :)

कॅनरी बेटं हे मोरोक्कोच्या पश्चिमेला सुमारे १०० किमी अंतरावर स्थित आणि लाखो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झालेल्या एका स्पॅनिश द्वीपसमूहाच्या ८ बेटांपैकी एक. आणि माझ्या इथल्या वास्तव्यादरम्यान यापैकी एका बेटावर, ला पाल्मा बेटावर, ज्वालामुखीचा उद्रेक होत होता. मात्र बातिस्तचे सुंदर ठिकाण, La Finca de Los Poetas (कवींचे घर), हे मात्र ग्रॅन कॅनरिया बेटावरचे. बातिस्त येथे एक अतिथीगृह (Guest House) चालवतो जे डोंगराच्या आत कोरलेल्या खोल्यांमध्ये राहण्याचा एक अनोखा अनुभव देते. एका डोंगराच्या उतारावर स्थित या गुहा पूर्वेकडील दुसऱ्या डोंगराकडे बघतात तर या दोन डोंगरांच्या मध्ये एक छोटीशी दरी वसते. अनेक स्थानिक झाडे असलेला इथला आजूबाजूचा परिसर खूप हिरवागार आहे. अंगणात एक सुंदर बाग आणि मासे असलेले पाण्याचे एक छोटे डबके. सोबतीला इथे ४ मांजरी, ५ कोंबड्या आणि लवकरच एक कुत्रा पण येतोय!
 

बातिस्त एक मनस्वी व्यक्ती! गेल्या २० हून अधिक वर्षांमध्ये त्याने जगभरातील अनेक सुंदर स्थळांचा प्रवास केला. खरेतर प्रवास करण्याच्या त्याच्या विशेष दृष्टिकोनामुळेच या भेटी आणि हे अनुभव इतके विलक्षण बनले आहेत. त्याचे बरेचसे प्रवास हे दीर्घकाळ केलेले मुक्कामही म्हणता येतील. या मुक्कामांत, अगदी जुजबी खर्चात, तो परकीय भूमी, तिथले लोक आणि संस्कृती यांचा आस्वाद घेत, निरीक्षण करीत, स्वतःला पूर्णतः झोकून द्यायचा. उदाहरणार्थ, त्याने भारतातील दुर्गम ग्रामीण भागांत एका वर्षांहून अधिक काळ घालवला. यापैकी दक्षिण भारतातील काही महिन्यांचा प्रवास तर त्याने एकट्याने, सायकलने केला!  

जर तुम्ही सौंदर्याचे भोक्ते असाल तर तुम्हाला La Finca de Los Poetas च्या प्रत्येक कोपऱ्यात त्याचा प्रत्यय येईल. तुमच्या लक्षात येईल की येथील सौंदर्याला साधेपणाची सहज झालर आहे. हे ठिकाण तुम्हाला नकळतच शांत, संथ आणि चिंतन करण्यास प्रवृत्त करते. इथल्या निसर्गाची जादू तर आहेच! दररोज समोरच्या डोंगरावरून उगवणारा सूर्य आपल्या चैतन्याने सारी दरी व्यापतो. तर रात्रीच्या वेळी डोंगरामागून उगवणारा चंद्र (Moon  Rise!)  त्याच दरीला आपल्या मंद प्रकाशाने स्नान करवतो. जर तुम्ही सकाळी लवकर उठणाऱ्यांपैकी असाल तर इथल्या छतावर, ताऱ्यांनी उजळलेल्या आकाशाखाली आणि आकाशगंगेच्या सोबतीने योगासने करण्याचा अनोखा आनंदही तुम्ही घेऊ शकता! 

या ठिकाणचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे बातिस्तच्या हातचा अवीट स्वयंपाक! बातिस्तच्या जगभरातील अनेक प्रवासांतील पाक-निरीक्षणे तसेच सेंद्रिय, शाकाहारी, आंबवलेले, पौष्टिक आणि नाविन्यपूर्ण आहारावरील त्याचे प्रेम तुम्हाला एक स्वर्गीय अनुभूती घडवतो. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्याच्या स्वयंपाकात ठायीठायी केवळ कल्पकताच नव्हे तर अनेकदा चवींचे धाडसी मिश्रणही आढळते. आंबट चव हलक्या कडूबरोबर अलगद मिसळलेली असू शकेल, तर गोड चव तिखटाबरोबर, आंबवलेले पदार्थ कच्या किंवा अंकुरितांसमवेत, तर फळे भाज्यांबरोबरही आढळतील आणि काही वेळा या वेगवेगळ्या चवी एकाच पदार्थांतही! इथली इडली ज्वारीचे पीठ आणि सूर्यफुलाच्या बियांपासून बनलेली असू शकेल, चॉकलेट मफिन्समध्ये सुके अंजीर, धणे आणि मिरची पावडरही असू शकेल तर सॅल्मन (Salmon) मास्यासारखे भासणारे, मसाल्याच्या तर्रित बुडलेले टरबुजांचे तुकडे ओव्हनमध्ये शिजवलेले असू शकतील. बघावे आणि चाखावे ते नवलंच! इथे चवी एकमेकांच्या सवंगडी आणि त्यांचा आपसातला खेळ अविरत सुरूच असतो. बातिस्तच्या बऱ्याचशा प्रेरणा या भारतीय, जपानी, इंडोनेशियन, थाई आणि इतर आशियाई पाक संस्कृतींमधून येतात. त्यात भर पडते ती त्याच्या फ्रेंच सौंदर्यदृष्टीची. जर आहाराला एक उदार मनाचे आणि खेळकर व्यक्तिमत्व असू  शकेल तर ते फिंकामध्ये (La Finca) आहे! आणि एव्हाना तुम्हाला अंदाज आलाच असेल  की हे सगळे घडवून आणायला त्याला अनेक तासांची, काळजीपूर्वक तयारी करावी लागते.


इथल्या वास्तव्यात तुम्हाला आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे बातिस्तची पर्यावरण सरंक्षणाची जाणीव आणि त्या अनुषंगाने त्याने केलेल्या निवडी. तुम्ही जर याबाबत त्याच्याशी चर्चा केलीत तर तो तुम्हाला आनंदाने या विचारांमागील त्याच्या प्रेरणा सांगेल. बातिस्तच्या गुहा कोरड्या शौचालयांनी (Dry Toilets) सुसज्ज आहेत, ज्यात पाणी अजिबात वापरले जात नाही. इथे वापरलेली साबणे, जंतुनाशके पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचवतील अशा काळजीने निवडलेली आहेत. इथले अनेक दिवे सौर उर्जेवर चालतात. येथे वापरलेले बहुतांश बांधकामसाहित्य जवळच्या परिसरातून येते. त्याच्या भाज्या घरामागील परसबागेतून येतात तर अंडी पाळीव कोंबड्यांमार्फत! इथले सात्विक-शाकाहारी जेवण, शांत आणि रम्य जागा तसेच बातिस्तचा लाघवी सहवास आपल्याला आपल्या घाई गडबडीच्या आयुष्यापासून काही काळासाठी तरी दूर घेऊन जातो.


आणि शेवटी, गुहांमध्ये झोपण्याच्या इथल्या माझ्या अनुभवाबद्दल. व्यक्तिशः, या गुहांमध्ये लागली इतकी गाढ आणि शांत झोप मला तरी इतर कुठल्या ठिकाणी, इतक्या सातत्याने लागल्याची आठवत नाहीजणू काही आपण मातेच्या गर्भात आहोत अशा प्रेमाने गुहा आपल्याला तिच्या कुशीत ओढून घेते. बातिस्तने एकदा मला सांगितले होते की त्याच्या जीवनाचे ध्येय हे त्याच्या सभोवतालचे जग सुशोभित करण्याचे आहे. जर तुम्ही त्याच्या फिंकाला भेट दिलीत तर तुम्हाला जाणवेल की तो हे किती समर्पकरीत्या घडवतो...


5 comments:

  1. अनुबंध - तुझा अनुभव अगदी अविस्मरणीय आहे. आणि त्याला तू खूप छान शब्दांत मांडले आहे. छायाचित्रांमुळे पोस्ट अधिकच प्रेक्षणीय झाली आहे. वाचून मजा आली. असे अजून वाचायला आवडेल.

    ReplyDelete
    Replies
    1. सुकल्प - तुला लेख आवडला हे वाचून मला खूप आनंद झाला! तुला कधी Canaries island ला भेट देता आली तर छानच ...दरम्यान मी आणखीन नवीन विषयांवर लेखन सुरु ठेवेन...:)
      भेटूया!

      Delete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. फार सुंदर व जिवंत अनुभव. तेवढ्याच ताकतीने समर्पक शब्दांमध्ये व्यक्त झालेला. पुढील अशाच आगळ्या वेगळ्या अनुभवांबद्दल आणि त्या संदर्भातील भावी लिखाणाबद्दल शुभेच्छा!

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्हाला लेख आवडल्याचा खूप खूप आनंद! Thank you..:)

      Delete

An overview of the Indian, French, and Eurozone economies with economist

  Presenting to you an engaging conversation with leading French economist and India specialist Jean-Joseph BOILLOT . Mr. BOILLOT qualif...