Friday, October 1, 2021

फ्रांसमधील वैकल्पिक राजकारणाचा अनोखा प्रयोग

 


अलीकडच्या काळात, जगात जवळजवळ सर्वत्र, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारांमध्ये आपण निरंकुश प्रशासन पद्धतीची अभूतपूर्व वाढ पाहत आहोत. तर दुसरीकडे उत्साहाची बाब म्हणजे, सृजन आणि सजग नागरिकांच्या पुढाकाराने लोक-सहभागी, पारदर्शक आणि न्याय्य प्रशासनाचा आग्रहही दिवसेंदिवस वाढतो आहे. एप्रिल २०२२ मध्ये होऊ घातलेल्या अध्यक्षीय निवडणुकांच्या धामधुमीत फ्रान्समधील काही नाविन्यपूर्ण उपक्रमांपैकी एक म्हणजे « La Primaire Populaire » (ला प्रिमेर पौपुलेर) आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

२०१७ च्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी राष्ट्रपती Emmanuel Macron (इमॅन्युएल मॅक्रॉन) यांनी समाजवादी पक्ष (Parti Socialiste-मध्य-डावे) आणि रिपब्लिकन (Les Républicains-उजवे) यांसारख्या पारंपारिक पक्षांच्या उमेदवारांना पहिल्या फेरीत पराजित करून खळबळ उडवली होती. त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्यांनी अती उजव्या बाजूच्या उमेदवार मारिन ल पेन (Marine Le Pen) यांना मोठ्या सहजतेने पराभूत केले होते. तेव्हापासून डाव्या, उजव्या आणि औद्योगिक जगतातील व्यक्तींच्या मिश्रणाने बनलेल्या त्यांच्या सरकारला अनेक गंभीर आव्हानांना आणि अलोकप्रियतेला सामोरे जावे लागले. यापैकी, गेल्या काही वर्षांतील ठळक आव्हाने, जसे: "Gilets Jaunes" (Yellow Vest) आंदोलन, हवामानासाठी नागरिकांचे अधिवेशन (La Convention Citoyenne pour le Climat), कोव्हिडचे दुर्व्यवस्थापन आणि अनेक सेवांच्या प्रवेशाची पूर्वअट म्हणून लागू करण्यात आलेला « आरोग्य पास » (Health Passport). लोकमानसात सद्य सरकार विरोधी नाराजी आणि असंतोष स्पष्ट असूनही राजकीय पटलाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असणाऱ्या पक्षांच्या कमकुवतपणामुळे २०२२ साली पुन्हा एकदा मॅक्रॉन-ल पेन यांच्या द्वंद्वाची शक्यता नाकारता येणार नाही.  

या पार्श्वभूमीवर, काही उत्साही नागरिकांनी डावे आणि हिरवे यांच्या राजकीय कुटुंबातून एक सामायिक उमेदवारी पुढे यावी यासाठीचे आव्हान स्वीकारले आहे. यात प्रामुख्याने ला फ्रान्स अँसोमीज (La France Insoumise-डावे), समाजवादी पक्ष (Parti Socialiste-PS) आणि युरोप इकॉलॉजी ले व्हेर (Europe Ecologie Les Verts-EELV) हे आहेत. विशेषत: PS आणि EELV पक्षांतून राष्ट्रपती पदासाठी इच्छुक उमेदवार अनेक आहेत. अशा प्रकारचा वैकल्पिक राजकारणाचा प्रयत्न २०१७ च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी २०१६ मध्येही  करण्यात आला होता. मात्र त्यावेळी राजकीय पक्षांना या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले होते [1].

फ्रान्समधील पक्षांतर्गत निवडणूक पद्धती (Les Primaires Françaises)

फ्रान्समधील "Primaire" ही कार्यकर्त्यांच्या मतदानामार्फत पक्षांतर्गत उमेदवार निवडण्यासाठीची एक प्रक्रिया आहे. यात मतदानाआधी, पत्रकारांद्वारे, दूरचित्रवाणीवर, इच्छुक उमेदवारांमध्ये वादविवाद घडवून आणला जातो. अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, अंतर्गत सुरक्षा, परराष्ट्र व्यवहार, अशा विविध राजकीय- सामाजिक विषयांचा यांत समावेश असतो. वादविवादानंतर मतदान होते आणि पहिल्या दोन उमेदवारांची दुसऱ्या फेरीसाठी निवड केली जाते. दुसऱ्या फेरीतील मतदानाआधी निवड झालेल्या दोन उमेदवारांत पुन्हा एकदा चर्चा घडवून आणण्यात येते. तथापि, सर्व राजकीय पक्ष या "Primaire" प्रक्रियेचा अवलंब करीत नाहीत. उदाहरणार्थ, ला फ्रान्स अँसोमीज पक्षात  सामान्यत: "Primaire" होत नाही आणि त्याऐवजी त्याचे संस्थापक ज्यो-ल्यूक मेलोंशों (Jean-Luc Mélenchon) यांना आपला उमेदवार म्हणून पक्ष घोषित करतो. « Primaire » आयोजित करायचे की एकमताने एखादा उमेदवार घोषित करायचा हे समाजवादी पक्षाने अद्याप ठरवलेले नाही. तर युरोप इकॉलॉजी ले व्हेरः ने « Primaire » प्रक्रियेचा अवलंब केला आहे. 

जन-आयोजित Primaire (La Primaire Populaire)

हा नागरिकांच्या पुढाकाराने आयोजित केलेला उपक्रम १६ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व फ्रेंच नागरिकांसाठी खुला आहे. त्यांच्या वेबसाइटवर (https://primairepopulaire.fr/) ११ ऑक्टोबरपर्यंत नागरिक आपल्या इच्छेनुसार जास्तीत जास्त उमेदवार प्रायोजित (recommend/endorse) करू शकतात. उमेदवार डाव्या-हिरव्या विचारसरणीच्या कुटुंबातील विद्यमान राजकीय पक्षांचे नेते असू शकतात किंवा किमान ५०० प्रायोजकत्व मिळविण्यात यशस्वी झालेला कोणताही नागरिक असू शकतो. ११ ऑक्टोबरनंतर पहिल्या ५ महिला आणि ५ पुरुषांची निवड केली जाईल आणि त्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले जाईल. त्यानंतर १३ ते १६ जानेवारी २०२२ दरम्यान मतदान केले जाईल [2]. तथापि या दहा निवड झालेल्या उमेदवारांसाठी दोन पूर्वअटी आहेत. यातील पहिली अशी की या प्रक्रियेतून जो कोणी उमेदवार अंतिम फेरीतून निवडून येईल त्याला पाठिंबा देऊन Primaire Populaire च्या निकालाचा आदर केला जाईल. आणि अंतिम फेरीत पराजयी झालेले उमेदवार त्यांची अध्यक्षीय उमेदवारी सार्वजनिकरित्या जाहीर करून मागे घेतील. दुसरे म्हणजे Primaire Populaire च्या आयोजकांनी प्रस्तावित केलेल्या सामायिक घोषणापत्राला मान्यता देऊन ते निवडून आल्यास त्याची अंमलबजावणी करतील [3]. एखाद्या उमेदवाराने या दोन अटी नाकारल्या तर त्याला या निवड यादीतून काढून टाकले जाईल आणि यादीतील पुढील उमेदवाराला चर्चेसाठी आमंत्रित केले जाईल. 

एकूण ४.७७ कोटी अधिकृत फ्रेंच मतदारांपैकी १ ऑक्टोबर २०२१ पर्यंत "Primaire Populaire" च्या वेबसाइटवर नोंदणी झालेल्या नागरिकांची संख्या  १२३४४५ (एक लाख तेवीस हजार चारशे पंचेचाळीस) होती [4].

जाहिरात आणि प्रसिद्धी

संसाधने आणि पारंपरिक प्रसारमाध्यमांवर प्रभाव यांच्या अभावाने या उपक्रमाच्या जाहिरातीचा भार उत्साही नागरिकांच्या खांद्यांवर येऊन पडला आहे. त्यामुळे ११ ऑक्टोबरच्या आधी अधिकाधिक नागरिकांनी वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी असा आग्रह आपल्या ओळखीपाळखीच्या लोकांत करण्यात स्वयंसेवक व्यस्त आहेत. याशिवाय इंटरनेटवर ही जाहिरातीसाठीची चर्चासत्रे घडवून आणण्यात येत आहेत. तसेच  फ्रान्समधील काही शहरांत स्वयंसेवक साप्ताहिक बैठका आयोजित करून झालेल्या प्रगतीचे आणि आजवरच्या  रणनीतीचे मूल्यांकन करतात.


वित्तपुरवठा 

या प्रक्रियेच्या  एकूण आयोजनचे तसेच अंमलबजावणीचे  बरेच खर्च आहेत. साधारणतः १५ व्यक्ती पूर्ण वेळासाठी पगारदार ठेवण्यात आल्या आहेत [1]. याशिवाय शिनिवार-रविवारी आयोजित करण्यात येणारे स्वयंसेवकांचे प्रशिक्षण, कायदेशीर बाबी सांभाळणारे वकील, सोशल मीडिया मोहिम, इत्यादींचा खर्चही आहेच. या सगळ्याचा अंदाजे खर्च ७,00,000 € आहे [5]. या खर्चाची पूर्तता देणग्यांद्वारे, तसेच डिसेंबर महिन्यात १६ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी २ € (युरो) अशा प्रतीकात्मक योगदानाने करण्यात येईल.

निष्कर्ष

या अनोख्या प्रक्रियेच्या निमित्ताने, एरवी निराशाजनक असलेल्या राजकीय वातावरणात, नागरिकांच्या सामूहिक आणि सक्रिय सहभागाद्वारे उत्साह आणि आशा जागृत झाली आहे. तथापि, या मोहिमेतील कल्पकता या गोष्टीत आहे की, लोकांनी ज्या उमेदवाराचा राजकीय कार्यक्रम आकर्षक वाटतो त्याला पाठिंबा देण्याऐवजी गेल्या काही वर्षांतील नागरिक चळवळींच्या मागण्यांनुसार लोक-सहमतीने तयार केलेल्या घोषणापत्राशी जुळवून घेण्यासाठी तयार असलेल्या उमेदवारांना पाठिंबा देणे! या घोषणापत्रातील काही महत्वाचे मुद्दे म्हणजे: पर्यावरण कायदा, घटना दुरुस्ती, नागरिकांमार्फत सुरू केलेले सार्वमत (referendum), इत्यादी [3]. La Primaire Populaire चे आदर्शवादी ध्येय म्हणजे डाव्या-हिरव्या कुटुंबातून एक सामायिक उमेदवारी पुढे आणणे आणि एक व्यावहारिक ध्येय असे की सर्वसहमतीचे घोषणापत्र उमेदवारांकडून मंजूर करून घेणे.

आणखीन एक विशेष असे की डाव्या-हिरव्या पक्षांतून, त्यांच्या स्वयंप्रेरणेने आणि समजूतदारपणाने, एक सामायिक उमेदवारी पुढे येणे तसे अवघडच ठरले असते. ते बाहेरून, नागरिकांच्या पुढाकारातून आणि दबावातून यायला हवे होते. आणि म्हणूनच या मोहिमेचे यश जास्तीत जास्त नागरिकांच्या सहभागात आहे. जेणेकरून ही प्रक्रिया आणि तिचा निर्णय उमेदवार बंधनकारक मानतील. 

या प्रक्रियेतून निकाल काहीही लागो परंतु पर्यायी आणि वैकल्पिक राजकारणाच्या उदयासाठी येणार महिने आशादायी दिसताहेत.

[1] https://france3-regions.francetvinfo.fr/provence-alpes-cote-d-azur/bouches-du-rhone/marseille/la-primaire-populaire-sur-les-traces-du-printemps-marseillais-pour-propulser-un-candidat-unique-a-gauche-en-2022-2247187.html

[2] https://www.20minutes.fr/elections/presidentielle/3147387-20211013-presidentielle-2022-vote-primaire-populaire-prevu-13-16-janvier

[3] https://primairepopulaire.fr/le-socle-commun/

[4] https://primairepopulaire.fr/

[5] http://primairepopulaire.fr/page-explicative-du-don/







 






2 comments:

  1. Very good informative article. Good to know about this initiative. It looks promising to bring transparency and better accountability.
    Keep on writing such informative articles.

    ReplyDelete
  2. Thanks Sukalp. I am glad you liked the article. True, the need for transperant, participative and accountable governance is relevant all over the world.

    ReplyDelete

Karachi : Désordre ordonné et lutte pour la ville

Ici un entretien captivant avec le professeur Laurent GAYER de SciencePo Paris à propos de son ouvrage phare, «  Karachi : Désordre ordonné...